दिवस 7 – शिकण्या - शिकवण्याचे रसायन
आज पहाटे 3 वाजताच जाग आली , झोप पूर्ण होऊन. बहुदा आता मी पण इथल्या दिनक्रमाला सरावलो आहे. पहाटे सूर्योदय व्हायच्या आधीच खोलीतून बाहेर पडलो. खूप मस्त वातावरण होते. हवीहवीशी वाटणारी थंडी , थोडे धुके , मंद चंद्र प्रकाश. अहाहा!! एखादी कथा , कादंबरी लिहायला पोषक वातावरण. पण फक्त वातावरण असून चालत नाही ओ.. विषय आडात लागतात तर पोहऱ्यात उतरणार. आमची वर्णने चंद्रप्रकाश आणि आकाश यातच संपतात. असो , सकाळच्या प्रार्थनेनंतर लगेचच उपासना करून घेतली. त्यानंतर चहा तर ठरलेलाच. आम्ही छात्रावासाचे पाहुणे असल्याने आम्हाला चहा , जेवण वगैरे वेळेत मिळावे यासाठी पण मुलांच्या वेगवेगळ्या गटांना ते काम दिलेले आहे. साकार आणि स्वप्नील खरे तर रोज चहा पीत नाहीत पण इथली मुले इतक्या प्रेमाने चहा आणून देतात की , नाही म्हणणे शक्य होत नाही. खास आमच्या साठी दूध घातलेला चहा बनवला जातो. पहिल्या दिवशी चहा नको वगैरे म्हंटल्यावर थोडा घोळ झाला. मुलांना वाटले की आम्हाला मिल्क पाऊडरचा चहा आवडला नाहीये. त्यांनी तसे त्यांच्या संबंधित शिक्षकांना सांगितलं बहुतेक कारण मग आमच्यासाठी अमूल ताजाचे दूध आणले गेले....