दिवस 5 – प्रयोगातली मजा, आणि सत्संगाचे प्रयोजन

आम्ही टेनिंगच्या शाळेत निवासाला होतो, तिथेच शाळांमधे प्रयोग दाखवत होतो.  त्यातून  वेळ मिळेल तेव्हा गावात फेरफटका, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, गाव समजून घेण्याचा प्रयत्न असं चालू होतं. त्यामुळे  रुढार्थाने पर्यटन किंवा पर्यटन स्थळं बघणं असं आम्ही करत नव्हतो, किंबहुना तिथे जाण्याचा तो हेतू नव्हताच. सहजिकच माझ्या लिखाणात काहीशी रुक्षता आणि तोचतोचपणा येऊ शकतो याची मला कल्पना आहे. वाचकांना काही संदर्भ लागले नाहीत तर जरूर मला कमेंट करामेसेज करा. माझ्यापरीने मी उत्तरे देईन.

आज हे मुद्दाम लिहावे वाटले कारण मी काही तसा रुढार्थाने लेखक नव्हे. मी घेतलेले अनुभव, प्रवास तुमच्या पर्यंत पोहोचवतोय इतकंच. चला, आजच्या प्रास्ताविक भाषणाचा आशय तुमच्या पर्यंत पोचलाय असं गृहीत धरून आजचा दिवस तुमच्या पुढे मांडतो..

काल रात्री तुलनेने लवकर झोपलो होतो (लाईट नसल्याचा परिणाम आणि मोबाईल, लँपटाँपने टाकलेली मान असेल कदाचित) त्यामुळे पहाटे लवकरच  जाग आली.  इथलं प्रातःस्मरण / सकाळची प्रार्थना वेगळी वाटते ऐकायला... तमसोमा ज्योतिर्गमय किंवा गायत्री मंत्र हे ऐकायला पण वेगळंच वाटतं. कारण तसंच आहे. आपल्याला मराठी ढंगाने हे सगळेच मंत्र, श्लोक म्हणायची, ऐकायची सवय आहे. स्वच्छ, शुद्ध, स्पष्ट हा मराठी खाक्या. दक्षिणेकडे गेलो तर तेच मंत्र, उच्चार वेगळ्या चालीत,ढंगात ऐकूनही आपल्याला वेगळे वाटते. इथली मुले संस्कृत मंत्र खूप वेगळे म्हणतात, म्हणजे त्यांचे उच्चार विशेष असतात. आता खरं म्हणायचं तर वेगळे म्हणजे काय तर आपण न ऐकलेल्या पद्धतीने, आवाजाचा वेगळा सूर लावून. न राहवून त्यांच्या गायत्री मंत्राचे ऑडिओ  रेकॉर्डिंग स्वप्नीलने केले आहे.

ते सोबत जोडतो म्हणजे तुम्हाला कल्पना येईल. या रेकॉर्डिंग करण्यामागे त्या मुलांची खिल्ली उडवणे किंवा चेष्टा करणे हा हेतू नाही, तर एकच मंत्र, जो संस्कृत भाषेतला आहे तो भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी कसा वेगवेगळ्या पद्धतीने, चाली, सुरात म्हंटला जातो ते सोदाहरण स्पष्ट करायचे होते.. क्विन्स इंग्लिश सोडले तर बहुतेक इंग्रजी जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते किंवा एकच चीज प्रत्येक घराण्यातील गायक वेगवेगळी गातो तसं... 

हे असा वाहवत जातो मी उदाहरणं देत बसतो. वर्गात शिकवलंय ना बरीच वर्ष त्यामुळे जरा सवय... तर मंत्र पठणानंतर मग उपासना, थोडा व्यायाम झाल्यावर श्री देवप्रियदास उर्फ राजूजी यांच्याबरोबर फिरायला बाहेर पडलो. टेनिंग गावाचा आत्ता पर्यंत न पाहिलेला भाग बघितला. 1968 साली सुरू झालेली सरकारी शाळा बघायला मिळाली. 

समोर दिसणाऱ्या असंख्य डोंगर रांगा. त्यापैकी तुलनेने जवळचा पण सर्वात उंच डोंगर - माऊंट किसा, हे राणी गाईडीनिल्यू (ह्यांच्या विषयी सविस्तर परत कधीतरी लिहीन) यांचे एकेकाळचे लपायचे ठिकाण. तिथे अजूनही काही चमत्कार घडत असतात म्हणे. त्याचे लांबूनच दर्शन घेतले.

आज सकाळच्या जेवणानंतर श्री रघुनंदनजी आणि मृत्युंजय असे दिमापूरकडे जायला निघणार होते. त्यामुळे त्यांच्या बरोबर थोड्या गप्पा. त्यांना प्रशांत सरांचे नुकतेच प्रकाशित झालेले "स्वाध्याय प्रवचने च" हे पुस्तक आणि आंबा बर्फी भेट दिली. त्या नंतर थोडा वेळ शिल्लक होता तेव्हा नागालँड स्टेट बोर्डाची 8वी आणि 9वी ची सायन्सची पुस्तके चाळून काढली. साधारण CBSE च्या धर्तीवरच अभ्यासक्रम आहे हे लक्षात आले.

साडे आठ वाजता शाळेत पोचलो. आजच्या सत्राची तयारी म्हणजे सामानाची जुळणी करून,शाळेच्या प्रार्थनेला उपस्थित राहिलो. आज आम्हाला एकावेळी दोन वर्गावर सत्र घ्यायची होती.

सकाळीच  इथल्या शाळेत 8वी आणि 9वी चे समांतर सत्र घेऊन मग दुसऱ्या शाळेत जायचे असे नियोजन होते. आजचा विषय force आणि motion असा होता. न्यूटनचे गतिविषयक नियम प्रयोगाद्वारे समजून घेणे खूप interesting असते. सत्र चालू असतानाच साधारण 10 वाजताच एक सर सांगायला आले की 5 मिनिटात संपवा, दुसरीकडे जायचे आहे. आम्ही सत्र/तास घेत असतानाच साकारने तिकडे जायची तयारी करून सगळे आवश्यक साहित्य एका पिशवीत तयार ठेवले होते.

मी वर्गातून बाहेर पडलोइथल्या शिक्षकांचे कौतुक असे की या शिक्षकांना  या शाळेबरोबरच अन्य शाळेतल्या विद्यार्थाना हे workshop मिळावे असे वाटते आहे. आपल्या शाळेला मिळाले की पुरे.. या सध्याच्या शाळा संस्कृतीमध्ये गावातील इतर शाळेतील मुलांना पण विज्ञान प्रयोग करता यावेत ही भावनाच खूप प्रेरणादायी आहे.

मी शिक्षक खोलीत स्वप्नीलचा तास संपायची वाट बघत होतो, तेवढ्यात निरोप आला की तिकडच्या बाप्टिस्ट चर्चच्या शाळेत जायचे नाहीये, तिथे काहीतरी दुसरा कार्यक्रम आहे. अरेच्चा, असे कसे झाले? कालपासून तर ठरले होते. तिथले सायन्स शिक्षक ह्या शाळेचे माजी विद्यार्थी, तिथल्या मुख्याध्यापकांनी  पण परवानगी दिलेली होतीच. मग? आता काय करायचे? मुळात असे का झाले ते कळेना. सव्वा दहा वाजले होते फक्त.

म्हंटले चर्चचा विचार नंतर करू. आधी आपण काय करायचे हे ठरवू. अनायासे वेळ मिळाला आहे आणि आपल्याकडे प्रयोगांचा खजिना मोठा आहे तर परत इथेच अजून एक तास घ्यावा का??  सुदैवाने स्वप्नीलचा तास सुरू असतानाच हा निरोप आल्याने त्याने तास continue केला होताच. मी ही परत नव्याने 8वी च्या वर्गात घुसलो. मुले पण खुश झाली.

आता मुलांचा सहभाग छान वाढला होता, मुले आपण होऊन प्रयोग करायला पुढे येत होती त्यामुळे तासाला मजा यायला लागली. पण सगळी मुलं खूप हळू आवाजात बोलतात, अगदी पुटपुटतात म्हंटले तरी चालेल. दुसरी समस्या म्हणजे या मुलांची नावे समजणे आणि लक्षात ठेवणे. आधीच माझी नावांची मेमरी वाईट आहे. असो.. शिक्षकाला मुलांची नावं लक्षात राहिली, ठेवता आली तर विद्यार्थी- शिक्षकातली नाळ पटकन जुळते... मी पण सतत प्रयत्न करत असतोच. पण इथे फारच कठीण जातंय.

Inertia बद्दलचा प्रयोग घेताना सहज विचारले की, "किती जणं बस मध्ये किंवा गाडी मध्ये बसलेले आहेत?" सहसा या प्रश्नाला अगदी आपल्याकडच्या खेडेगावात पण सगळे हात वर करतात. पण इथे वर्गातल्या 7-8 जणांनी पण हात वर केले नाहीत. त्यांच्या गावात जायला रस्ताच नाही, चालतच यावे लागते. हा मला नवीन अनुभव. प्रयोगांची रोजच्या आयुष्यातली उदाहरणे देताना अशी अडचण येऊ शकते हे आजच कळले.

बलून रॉकेटचा प्रयोग मात्र सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. अगदी प्रत्येकाने त्यात सहभाग घेतला आणि नंतरच्या चर्चेत सहभाग पण घेतला. 

छोटा चेंडू आणायचा राहिला आणि इथे पण मिळाला नाही त्यामुळे bouncing बॉलचा प्रयोग मात्र घेता आला नाही. पण ball in bucket चा प्रयोग ball ऐवजी कापडी चेंडू वापरून मैदानावर जाऊन घेतला. इतर वर्गातली मुले पण त्यावेळी हे काय चालू आहे असे उत्सुकतेने बघत होती. प्रयोग, त्यातले विज्ञान आणि त्यातली मजा या नादात मैदानावर असताना फोटो काढायचे राहून गेले.

शाळेची मधली सुट्टी होई पर्यंत  हे चालू होते.  मधल्या सुट्टी मध्ये सर्व शिक्षकांना खास महाराष्ट्रीय खाऊ म्हणून आंबा बर्फी खिलवली.  इथे आंबा पण नाही आणि खवा पण नाही त्यामुळे आंबा बर्फी हा खूपच वेगळा पदार्थ वाटला सगळ्यांना.

कालपासून इथल्या मुख्याध्यापिका सौ तलामसी यांचा आग्रह होता की 10वी च्या वर्गावर पण प्रयोग घ्यावेत. आज अनायासे वेळ उपलब्ध होता त्यामुळे मधल्या सुट्टी नंतर 11.30 ते 1 पर्यंत आम्ही दहावीच्या वर्गात.  Theme चे बंधन नसल्याने बाकी प्रयोगाबरोबर मग सगळ्यांना आवडेल आणि हाsss होईल असा heating water in paper cup हा प्रयोग घेतला. हा प्रयोगच भारी आहे. खालून, वरून कप पेटतो पण पाणी असलेला भाग शाबूत राहतो, पेटत नाही आणि पाणी पण गरम होते हे बघायला खूप भारी वाटतेच.

साधारण दीड वाजता परत निवासात आलो. आज लक्ख ऊन पडलेले होते . Bright sunny day...क्वचितच सनी डे मिळाला की वाटतंच कवतिक... आपल्याकडे सततच सनी डे. त्यामुळे थोड्या वेळाने अंघोळ करायची असे ठरवून एक डुलकी काढली. तत्पूर्वी थोडी गुळाची पोळी आणि थोडा चिवडा खाल्ला हे सांगायला नको. कितीही झाले आणि इथले जेवण सकाळी ८ लाच जेवलो असलो तरी दुपारचे  दीड दोन वाजले की भूक लागतेच ना! शेवटी दिवेकर बाई सांगतातच दर दोन तासांनी खा. आमच्या बरोबर पण नवयुवक साकार दिवेकर होताच. नाव त्याचे पण गुळाची पोळी खावीच लागते ओ.

दुपारी अंघोळ, कपडे धुणे असा प्रोग्रॅम उरकून ताज्या दमाने फिरायला बाहेर पडलो. वेगळ्या दिशेला थोडे उंचाकडे गेलो. तो रस्ता फिरून परत गावाच्या मुख्य चौकाकडेच गेला हे वेगळे. तिथून पुढे गावाबाहेर जाऊन आलो. स्टेट बँकेची ब्रँच आणि एका दुकानात चालणारा इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप पहिला. अजून सगळे गांव डोळ्यासमोर आलेले नाही.

येता येता राजुजींच्या घरी डोकावलो. सकाळी चर्च शाळा प्रकरण नेमके काय घडले हे जाणून घ्यायची उत्सुकता होती ना! पण तिथे वेगळेच. लोक जमायला सुरुवात होत होती. कसली तरी पूजा असावी असे वातावरण. शाळेतले काही शिक्षक, काही विद्यार्थी, अन्य काही नागरिक असे जमले. 20-25 तरी असतील. कशासाठी? तर या गावात सध्या हिंदू किंवा हराक्काची फक्त 20 घरे आहेत. बाकी सगळे ख्रिश्चन. तर हे सगळे 20 कुटुंबीय दर गुरुवारी एका घरी जमतात. काही स्तोत्र पठण, वाचन, काही मंत्रोच्चारण असा सत्संग असतो.

आमची पण ओळख सगळ्यांना करून दिली आणि आम्ही का आलोय, कुठून आलो आहे वगैरे सगळ्यांना सांगायला लावले. एवढे हिंदीमध्ये झाले आता बाकी सगळे नागामीज भाषेत. इंग्रजी लिपी मधली पण नागामीज भाषेतील पुस्तके बघायला मिळाली. त्यातले एक हराक्का समाजाचे धर्मग्रंथ असल्यासारखे, जीवन विचार मांडणारे. भाषा काळत नव्हती पण भाव आणि देहबोलीवरून थोडे थोडे कळत होते. सर्व दिशांच्या देवतांना नमस्कार करणे  वगैरे होते. शेवटची प्रार्थना आपल्याकडच्या भजनाची आठवण करून देणारी. 

आणखीन एक वेगळा प्रकार पाहायला मिळाला. प्रसाद म्हणून केळीचा घड आणलेला होता. पण त्याचा लिलाव झाला. जास्तीत जास्ती बोली लावणाऱ्याने तेवढी रक्कम मंदिराच्या खात्यात जमा करायची. वार्षिक उत्सव वगैरेच्या वेळी ही रक्कम वापरली जाते.  अल्पसंख्य जमातींमधे सुद्धा उत्सव आणि अन्य धार्मिक गोष्टी चालू राहाव्यात म्हणून ही पद्धत. 20 हिंदू कुटुंब ती टिकली पाहिजेत, प्रेरित असली पाहिजेत आणि मुख्य म्हणजे धर्माभिमान जागृत राहिला पाहिजे म्हणून सतत काही काही सुरू असते या गटात असे जाणवले. यात धर्माचा दुराभिमान नाही तर स्वधर्माबद्दल आस्था, प्रेम, पर्यायाने राष्ट्राभिमान जागता ठेवण्यासाठी केलेली सामुदायिक कृती. ज्यामुळे आपण इथे एकटे नाही ही भावना दृढ राहील..प्रसादानंतर तीर्थ प्राशन आलेच. अनुभवी लोकांना तीर्थ काय हे सांगायला नकोच !! इथली खास rice beer. थेंबभर तरी घ्याच असा आग्रह. आपल्या दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात घरी आलेल्याला "चा"  घेतल्याशिवाय जायचं नाय.. ही दटावणी. तसाच  इथे राईस बिअरचा आग्रह... हे एकदा समजून घेतले की सव्य, अपसव्य होत नाही.  आपण आपल्याकडे पूजेच्यावेळी चारही दिशांना शुद्धोदक शिंपडतो तसे बोट त्यात बुडवून तोंडाकडे शिंपल्याची कृती केली!!!! असो.

अचानकपणे हा मंत्रोच्चारण मेळा ,कौटुंबिक वातावरण सगळे अनुभवायला मिळाले म्हणून छान वाटलेच. बाहेर  पडताना राजूजी सोडायला आले. त्यांच्याकडून नवीन माहिती कळली की आधी ठरले असले तरीही आज त्या बाप्टिस्ट चर्चच्या management कमिटीने  आम्हाला तिथे जाऊन विज्ञान प्रयोग शिकवायला अचानक, ऐत्यावेळी नकार दिला म्हणे. वाह! ही खरी श्रद्धा म्हणायची का? की आमच्याबद्दलचे भय? उद्या प्रयोग दाखवायला नाही तर नाही, नुसती त्या शाळेला सदिच्छा भेट द्यायला तरी जायचेच असे ठरवले. बघूया योग येतो का!

एव्हाना रात्रीचे साडे नऊ वाजून गेलेत. इथली मुले नऊ वाजताच झोपतात. साकार-स्वप्नील पण कधीच झोपलेत. माझ्या डोक्यात मात्र चर्चने आम्हाला नकार दिला  हे घोळत राहिलेय. आज सगळ्याच प्रयोगांना मजा आली आम्हाला आणि मुलांना देखील.. एक बरं असतं गणित, विज्ञान हे विषय धर्मनिरपेक्ष असतात. कुठेही जा न्यूटन तेच म्हणतो, पाणी पाण्यासारखंच वागतं, हवा हवेसारखीच वागते आणि 2+ 2= 4 च असतं. मला काय म्हणायचंय ते समजावून सांगायला शब्द, आणि लेखन कौशल्य कमी पडतंय ओ.. कारण मी टिपिकल मेकँनिकल इंजिनिअर आणि गणित शिक्षक आहे.

आता लिखाण थांबवावे हे उत्तम. शुभ रात्री

अमर परांजपे @ 21 एप्रिल 2022

Comments

  1. आम्हालाही हे प्रयोग शिकायला आवडतील, कारण अशा प्रकारे विज्ञान नाही शिकतो कधी...

    फक्त 20 हिंदू कुटुंब- त्यानी टिकून राहायचं-......

    ReplyDelete
  2. Nice end..air water and newton is everywhere .whercer you go!

    ReplyDelete
  3. Once a teacher, Always a teacher!! Doing great work Sir! ~ Rudra

    ReplyDelete
  4. वेगळीच संस्कृती अनुभवायला मिळते आहे....

    ReplyDelete
  5. चांगलं लिहिता की राव. उगाचच आपलं,' मला जमत नाही , मला जमत नाही ' म्हणत रहायचं...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दिवस १ - पार्श्वभूमी

दिवस 3 - दिमापूर... आणि टेनिंग प्रवास