दिवस 3 - दिमापूर... आणि टेनिंग प्रवास

आजचा दिवस विशेष असणार हे  माहिती होते. दिमापूर ते टेनिंग प्रवास हे आजचे उद्दिष्ट.

आधीच्या नियोजनाप्रमाणे सकाळी लवकर निघणाऱ्या नागालँड स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसने किंवा सुमोने हा प्रवास करायचा होता. साधारणपणे ईशान्य भारतात मोठ्या प्रवासाला पहाटेच सुरुवात केली जाते. दुपार नंतर प्रवास टाळला जातो. काही ठराविक शहरांमधील प्रवास असेल तर नाइट सुपर बसेस असतात पण त्या अपवाद.

पण.. कालच कल्याण आश्रमाचे नागालँड प्रांताचे संघटनमंत्री रघुनंदनजी यांचा फोन आला  आणि ते आमच्या बरोबर येणार आहेत हे त्यांनी सांगितले. त्यामुळे दुपारी 2 वाजता निघायचे  आणि JVSN (जनजाती विकास समिती नागालँड) च्या गाडीनेच जायचे आहे, हेही त्यांनी सांगितले.

थोडक्यात काय तर सकाळ मोकळी होती. दिमापूर मार्केट फिरायला जायचे ठरले. अर्थातच उत्सुकता काय बघायची होती हे सांगणे न लगे!!

इथे आमच्या गटात चौथा भिडू सामील झाला. औरंगाबादचा मृत्युंजय जाधव, नुकतीच 10वीची परीक्षा दिलेला आणि एकटा नागालँड बघायला आलेला सोलो ट्रॅव्हलर. अर्थात नागालँडमध्ये असे एकट्याने फिरणे धोक्याचे असते. का? तो अनुभवच घ्यावा लागतो!!

रिक्षा पकडून मार्केट भागात पोचलो. तुलनेने छोटे शहर असून पण चारचाकी वाहनांची खूप जास्ती संख्या आणि अती दिव्य रस्ते असल्याने वाहन दुरुस्ती, सुटे पार्ट विक्रीची किंवा टायर विक्रीची खूप जास्ती दुकाने दिसत होती.

आधी गेलो ते राजवडी भागात. जुन्या काळातल्या नागा राजाचा राजवाडा किंवा राजवाड्याचे अवशेष. वैशिष्ट्य असे की एका दगडात कोरून केलेले खांबासारखे अनेक अवशेष तिथे आहेत. इंग्रजी मध्ये त्याला monolith म्हणतात. त्याचा आकार बुद्धिबळातील प्यादासारखा किंवा सोंगटी सारखा. भीमाची पत्नी हिडिंबा आणि मुलगा घटोत्कच इथे राहत अशी एक कथा आहे आणि त्यावरून ह्या शिल्पांना घटोत्कचाच्या सोंगट्या पण म्हणतात.

तिथून पुढे सुरू झाले ते भाजी मार्केट. बटाटा, वांगी, कांदे अश्या ओळखीच्या भाज्या दिसत होत्याच. पण मध्येच एकदम पिवळट रंगाच्या शेंगा दिसल्या. शेंगदाण्याची जरा वेगळी variety असावी असे वाटत असतानाच जाणवले की त्यात हालचाल होते आहे! नीट बघितल्यावर कळले की त्या आळ्या आहेत. रेशमाच्या आळ्या. हो, बाजारात विकायला, भाजी बाजारात. 

मग कळले की इथल्या बाजारात शाकाहारी - मांसाहारी असे द्वैत अजिबात नाही!!! सगळे कसे मिळून मिसळून. म्हणजे कसे की पालकाची पेंडी घेता घेता बेडकांची तंगडी पण घेता येते. एकदा हे समजल्यावर पुढचा बाजार बघणे बरेच सुसह्य झाले. विविध भाज्या आणि मासे, खेकडे, उंदीर, बेडूक, कोंबडी, अळया, डुक्कर, कुत्रा असे प्राणी आणि त्यांचे मांस विकायला होते. अगदी पोत्यात भरून ठेवलेली जिवंत कुत्री पण होती (पुण्यात चितळे दुकानात बाकरवडी ताजी आहे ना हो? असे विचारतात तसे इथे विचारायची गरज नाही. एकदम ताजे, जिवंतच !)

असे सगळे विकणारे आणि विकत घेणारे यांचे दर्शन माझ्यासारख्या महाराष्ट्रवासियाला दुर्लभच. ते झाल्यावर कार्यालयात परतलो, अर्थातच कोणतीही ताजी भाजी न घेता परतलो. आता किळस किंवा आश्चर्य जाऊन समजूत पटली की आपल्याकडे काही लोक बकरी, कोंबडी खातात तसेच तिथे काही लोक कुत्रा, बेडूक खातात... तसा विचार केला तर बकरी आणि कुत्रा आकाराला सारखेच. कुत्रा खाऊन पाहिला नाही त्यामुळे चवीचे माहिती नाही... असो. भारतात कुठेही गेलो तरी स्टेपल फूड तरी भात आहे हीच काय ती भोजनसमानता.. बाकी विविधतेत एकता...

जेवण करून पुढच्या प्रवासाच्या तयारीला लागलो. गाडीत सामान भरणे हे एक विशेष होते. बोलेरो गाडीतून आम्ही चौघे, रघूनंदनजी आणि चालक असे 6 जणं, आमच्या 9 बॅगा आणि त्याशिवाय दिमापूरमधून टेनिंगच्या शाळेत न्यायचे खूप सारे सामान... त्यात अगदी हनुमान जयंतीच्या प्रसादाच्या एक पोतभर गोड बुंदी पण. 2-3 iteration करून एकदाचे सगळे सामान गाडीत बसवले. (गाडी भरणे ,सामान बसवणे हे माझे नित्याचेच काम आहे, घरच्या गाडीवर आणि पूर्वी छात्र प्रबोधनचे दिवाळी अंक पोचवताना  याचा बराच सराव आहे तरी इथे कस लागला.) गाडीला वरती carrier नव्हते नाहीतर अजून 2 पोती नेता आली असती.

दुपारी 2:15 ला अखेर प्रवास सुरु झाला. माझ्या तरुण मित्र-मैत्रिणींनो, जरा बघा बरं गूगल मॅप वर हा प्रवास, त्याचे अंतर, लागणारा वेळ... नाही ना सापडत. अहो, गुगलला हा रस्ता माहीतच नाही. म्हणजे मग रस्ता आहे तरी का अशी शंका यावी अशी परिस्थिती. नकाशावर अंदाज काढला तर अंतर साधारण सव्वाशे (125) किलोमीटर  म्हणजे साधारण सांगली- सातारा एवढे. पण म्हणे लागणारा वेळ 6-7 तास, तो ही स्वतः ची गाडी असेल आणि सरावाचा चालक असेल तर.. एरवी बसला किमान 9-10 तास.

पहिल्या तासभर प्रवासानंतर घाट रस्त्याला सुरुवात झाली. घाटात एके ठिकाणी आपल्या वरंधा घाटात कसे भजी वगैरेचे स्टॉल आहेत तसे स्टॉल दिसले. बरोबर काही भाजी विक्रेते. टेनिंगला भाजी मिळत नाही म्हणून मग भाजी खरेदी झाली.  त्यावेळी साकार आणि मृत्युंजय असे दोघे रस्त्याने चालत पुढे गेले. पण हे कळल्यावर आमचा चालक आणि रघुनंदनजी थोडे टेन्शन मध्ये आले. एक दोन वळणे झाली तरी ही दोघे दिसेनात. ह्याभागात underground ऍक्टिव्हिटी खूप चालतात आणि नवखा माणूस दिसला तर त्याला पळवून नेणे वगैरे प्रकार पण होतात म्हणे. पण आणखीन 2 वळणे झाल्यावर आमचे दोघे भिडू रस्त्यावर उभे दिसले. हुश्श झालो. साक्षात "मृत्युंजय साकार"

जालुकी टाऊन पूर्वी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. इतका पाऊस की गाडी कडेला थांबवावी लागली. मग चहाचा एक ब्रेक, बरोबर मोमो.

गाडीत बरोबर रघुनंदनजी असल्याने अखंड गप्पा सुरु होत्या. वेगवेगळे अनुभव. हे मूळचे तुळजापूरचे. गेल्या वर्षी मार्च मध्येच नागालँड मध्ये संघटन मंत्री म्हणून रुजू झालेत. वय साधारण 37-38… आल्या आल्याच दुसऱ्या lockdown मध्ये अडकले आणि ते पण टेनिंग मध्ये. त्यामुळे टेनिंग विषयी विशेष जिव्हाळा आणि भरपूर माहिती.

जालुकी टाऊन सोडले तेव्हा साधारण  संध्याकाळचे पाच वाजले होते. या नंतर येणाऱ्या बी-जालुकी गावात एकेकाळी ज्ञान प्रबोधिनीने सुरू केलेली आणि आता विद्याभारती चालवत असलेली शाळा असल्याचे माहिती होते. ती शाळा बघायची उत्सुकता होती पण त्यापूर्वीच गाडीने रस्ता बदलला. पेरेन या जिल्ह्याच्या गावी जाऊन पुढे जाणारा रस्ता लांबचा असल्याने चालकाने वेगळा रस्ता पकडला. टेनिंग 71 किमी अशी पाटी वाचली. म्हणजे सांगली कराड इतके अंतर. मी गाडी चालवत अनेकवेळा हे अंतर 50 मिनिटात पण पार केलेले आहे. इथे डोंगराळ भाग आणि जरा खराब रस्ता. हे दोन्ही आमच्या कोकणात पण असतेच की, इतके काय कौतुक. जास्ती जास्ती म्हणजे 2 तास लागतील. पण नाही. इथे अंतर-वेळ-वेग यांची गणितं वेगळीच आहेत. काय? रस्ता कसा होतारस्ता नव्हताच. अहो, गाडी जाऊ शकेल एवढ्या रुंदीची पायवाट म्हणा हवं तर. कधी कोणे काळी त्यावर डांबर टाकले होते म्हणे. सोबतचे व्हिडिओ आणि फोटो पाहून पण नाही अंदाज यायचा. 'एक तरी ओवी अनुभवावी सारखे', एकदा तरी ह्या रस्त्याचा अनुभव घ्याच, एवढेच सांगीन. काय, सांगली- इस्लामपूर रस्ता खूप खराब आहे म्हणता? मग भाऊ इकडे याच एकदा आपल्या वाट्याला आलेला रस्ता किती चांगला हे पटेल आणि इस्लामपूर रस्ता सुधारेल अशी आशा वाटत राहायला मोटिव्हेशन मिळत राहील.

पाय मोकळे करण्याचा पहिला थांबा junction वर. म्हणजे पेरेन गावातून येणारा लांबचा रस्ता जिथे आमच्या रस्त्याला मिळाला तिथे. सहा वाजून गेले होते. मिट्ट काळोख. किती अंतर आलो हे कळायला काही मार्ग नाही.  सतत एकीकडे डोंगर एकीकडे दरी असा रस्ता, सतत वळणे पण वेग कधी तीस च्या पुढे गेला नाही आणि गाडीचा चौथा गियर काही पडला नाही. या ठिकाणी पण गाडीत गप्पा चालूच होत्या पण माझ्यातला हाडाचा ड्रायव्हर (चालक ) सजग होता.

पुढचा थांबा अंदाचे 7 वाजता, ओल्ड टेसेन या गावात. रघुनंदनजीच्या ओळखीच्या एका घरात चहा झाला. जेवण करूनच जा असा आग्रह पण झालाच. पण ते शक्य नव्हते. चहा पिऊन बाहेर आलो तर चालक गायब. तो म्हणे अंग गरम करायला गेला होता. सूज्ञ वाचकांना आणखी तपशील सांगायची गरज नाही.  पुढचा अर्धा तास इथल्या rice beer चे महात्म्य ऐकण्यात गेला. इतका वेळ गप्प असणारा चालक पण आता बोलू लागला होता. 

न्यू टेसेन गावात टेनिंग 24 किमी ची पाटी लागली. छान वाटले. पण तेवढ्यात अजून दीड तास लागेल अशी घोषणा पण झाली. सायकलने पण आम्ही फास्ट जातो हो.  या सगळ्यात एक मात्र जाणवत होते की सगळी गावे खूप स्वच्छ, घाणीचा लवलेश नाही की खेडेगावात येणारी दुर्गंधी नाही. इथे प्रत्येक घरात शौचालय असतेच आणि कोणीही रस्त्यावर कचरा टाकत नाही, हे ऐकून खूप भारी वाटले.

एव्हाना खराब रस्त्याची सवय झाली होती. आमच्यातले काही जण झोपी गेले होते. एवढ्यात झीरो पॉईंट अशी पाटी दिसली . इथून एक फाटा आसाम मधल्या हाफलॉंग भागाकडे जातो तर दुसरा रस्ता टेनिंग वरून मणिपूर कडे जातो. टेनिंग 3 किमी. इथून पुढे मात्र चांगला चढ.

हळूहळू दिवे दिसायला लागले. पाहिले घर दिसले, मुख्य चौक आला, गाडी वळली, मुलींचे वसतिगृह, मग अजून 2 वळणे, मग शाळा मग अजून एक वळण आणि मग मुलांचे वसतीगृह. हेच आमचे इष्ट स्थळ. घडाळ्यात 9 वाजले होते. सुदैवाने mseb च्या नाही-नाही nseb च्या कृपेने लाईट होते.

समान उतरवले. आम्ही आणि सामान सगळे सुस्थितीत होतो! छात्रावासाच्या अतिथीगृहात उत्तम व्यवस्था. आम्हाला गरम जेवण मिळावे म्हणून आम्ही आल्यावर स्वयंपाक सुरू केला गेला. सगळं तयार करून आयत्यावेळी गरम करणे वगैरे शहरी पद्धती इथे नाहीत. सगळे ताजे, सस्नेह भावाने, आपुलकीने..

हवेत चांगलाच गारठा, रजई घेऊन झोपावे लागेल एवढा.

उद्या पासून इथल्या शाळेत सत्र घ्यायची आहेत त्याबद्दल उत्सुकता, ओढ आणि आपण आपल्याच देशातल्या ईशान्य भागातील नागालँड राज्यातील टेनिंग गावातील एका शाळेच्या अतिथीगृहात स्वच्छ गादी, उशी, रजई घेऊन झोपलो आहोत आणि आपण टाईप करत असलेल्या लँपटापची बँटरी पण झोपायला लागलीय... या विचारात झोप कधी लागली हे  कळले नाही.

अमर परांजपे @19 एप्रिल 2022


Comments

  1. अप्रतिम प्रवास वर्णन सर!!

    ReplyDelete
  2. Interesting tour....

    ReplyDelete
  3. Superb Amar, keep it up

    ReplyDelete
  4. वाचूनच जायची इच्छा झालीये....

    ReplyDelete
  5. विजय निकमMay 9, 2022 at 10:43 AM

    पांग ते सारचू हा लदाख मधला प्रवास असाच आहे. गूगल मॅप वर 4 तास दाखवणारे अंतर संध्याकाळी 7-8 तास लागतात

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दिवस १ - पार्श्वभूमी

दिवस 5 – प्रयोगातली मजा, आणि सत्संगाचे प्रयोजन