दिवस 12 – समारोप

पहाटे जाग आली तीच मुळी गुवाहाटी स्टेशन वरच्या announcement मुळे. गेल्या 8 दिवसात टेनिंग मुक्कामात अश्या गदारोळाची – आवाजाची सवयच गेली आहे याची जाणीव झाली.

रस्ता शोधत शोधत चालण्याच्या अंतरावर असलेल्या  वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यालयात पोचलो. काल संध्याकाळीच दिमापूर मधून तसे कळवलेले होते. पण इथे पोचलो तर बाहेरच्या फाटकला कुलूप आणि फोनला सुद्धा काही प्रतिसाद नाही. बहुदा आम्ही नेमके किती वाजता पोचणार ह्याची कल्पना तिथे मिळाली नव्हती. सुदैवाने शेजारीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय पण आहे आणि तिथले एक जण जागे होते. त्यांनी आम्हाला आत घेतले आणि आतल्या बाजूने कल्याण आश्रमाच्या कार्यालयात पोचवले. आता 2 तास तरी परत झोपायला हरकत नाही असे म्हणून आडवे होणार इतक्यात स्वप्नीलच्या लक्षात आले की त्याचा स्वेटर रेल्वेमध्येच विसरला आहे. रेल्वेचा शेवटचा थांबा गुवाहाटीच असल्याने स्वेटर मिळायची शक्यता होती. त्यामुळे स्वप्नील परत स्टेशनकडे रवाना झाला. जवळ जवळ 2 तासांनीच तो परत आला तो स्वेटर घेऊनच. पार अगदी यार्ड मध्ये जाऊन वगैरे त्याने काय काय केले ही कथा त्याच्या तोंडूनच ऐकण्यासारखी आहे.

इकडे मात्र मी काही झोपू शकलो नाही तेवढा वेळ. साधारण पावणेपाच वाजता कार्यालयाला जाग आली. प्रांत संघटन मंत्री आणि तिथले कार्यालय प्रमुख श्री. मोहनजी भगत यांच्याशी भेट पण झाली. बरोबर 5 वाजता प्रातःस्मरण,  एकात्मता स्त्रोत्र आणि गायत्री मंत्र – होय वनवासी कल्याण आश्रमाच्या कुठल्याही निवासी कार्यालयात पहाटे बरोबर 5 वाजता प्रातःस्मरण होतेच..  अगदी तसेच इथेही झाले.. टेनिंग असो किंवा दिमापूर किंवा गुवाहाटी, खरंतर भारतभर कुठेही. ज्ञान प्रबोधिनी, विवेकानंद केंद्र किंवा अशा अनेक  संस्थांमधे त्या त्या ठिकाणी ठरलेल्या  एकाच वेळी होणारी  उपासना/ प्रार्थना ही अवघड परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण सगळे एक आहोत ,बरोबर आहोत ही भावना दृढ होण्यासाठी ,जोडले जाण्यासाठी चांगलीच  उपयोगी आहे. आता भारतभर सर्वच संस्थांमधे  लोक एकच उपासना करतील का,ते योग्य आहे का,उपयोगी पडेल का,शक्य आहे का...असे अनेक प्रश्न मनात येत राहतात. उपासनेबद्दल इथे फार बोलत नाही. थांबतो.

बऱ्याच दिवसांनी नळाला पाणी येते आहे अश्या स्वच्छता गृहात आंघोळ करायला मिळाली. काय ना – 10 दिवसांपूर्वी मला विचारले असते तर माझ्या आनंदाच्या कल्पनेत हे आलेही नसते. छोट्या छोट्या गोष्टी पण आनंद देऊ शकतात ना आपल्याला. त्याचवेळी विकास आणि आनंद ह्यांचा नेमका काय संबंध आहे- असे तात्विक विचार पण मनात आल्याशिवाय राहिले नाहीत. आत्ता याविषयी पण काही बोलत नाही. पुढे जातो..

सगळे आवरून बरोबर 8 वाजता VKIC – Vivekanand Kendra Institute of Culture – इथे पोचलो. मुळच्या महाराष्ट्रातल्या पण गेली अनेक वर्षे इथे काम करणाऱ्या मीरा दीदी कुलकर्णी यांना भेटायचे होते. “सकाळी नाश्ता करायला इकडेच या” असा त्यांचा निरोप मिळालेला होता. सकाळचा नाश्ता – हे ही प्रकरण गेल्या 8 दिवसात विसरायला झालेले. गुवाहटीत ब्रह्मपुत्रा नदीच्या अगदी किनाऱ्यावर खूप देखण्या वास्तूमध्ये हे कार्यालय आहे. पुरी, उसळ, लोणचे, गूळ असा जोरदार नाश्ता तर झालाच पण मीरा दिदींबरोबरच विवेकानंद केंद्राचे कार्यवाह श्री भानुजी आणि treasurer श्री. प्रविणजी दाभोळकर यांची पण भेट झाली. एकावेळी हे सगळे भेटणे हे खरंच भाग्याचे. सतत प्रवासात असणारे भानुजी सुदैवाने आज थोडा वेळ मोकळे होते. आमच्या नागालँड भेटीची खूप आस्थेने चौकशी तर झालीच पण मनात आलेले अनेक प्रश्न विचारायला हक्काचे ठिकाण मिळाले. सगळ्या प्रश्नांना उत्तरे मिळाली नाहीत हे जितके खरे आहे, तितकेच काय दिशेने विचार करायला हवा हे समजायला मदत झाली.

आम्ही चर्चच्या शाळेत जाऊन विज्ञान कार्यशाळा घेऊन आलो ह्याचे त्यांना पण आश्चर्य वाटले. त्याला जोडूनच मग नागालँड आणि ईशान्य भारतातील अन्य राज्यांमध्ये झालेले आणि चालू असलेले धर्मांतरण हा विषय आलाच. ते सगळे तपशीलवार लिहिणे जरा अवघड आहे. पण दोन गोष्टी पूर्णपणे नव्याने कळल्या. पहिली म्हणजे मोठ्या प्रमाणात हिंदू लोकांना ख्रिश्चन करताना वापरलेली pseudo christanity ची संकल्पना. म्हणजे काय तर जन्म झाल्यावर नामकरण विधी, लग्न आणि मृत्यू नंतरचे विधी हे फक्त ख्रिश्चन धर्माप्रमाणे केले पाहिजेत, बाकी चालू प्रथा चालू ठेवायला हरकत नाही. यामुळे अनेक लोक पटकन ख्रिश्चन व्हायला तयार झाले. मग उरलेल्यांना बंदुकीचा धाक दाखवणे सोपे गेले.

दुसरा आणि खूप महत्त्वाचा वाटलेला मुद्दा म्हणजे भारताला स्वातंत्र मिळाले तेव्हाच राष्ट्रीय चर्चची स्थापना व्हावी अशी झालेली मागणी. सध्या भारतातले सगळे ख्रिश्चन हे अंतिमतः युरोप किंवा अमेरिकेमध्ये असलेल्या धर्मगुरुंना मानतात आणि मग त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामध्ये भारताच्या राष्ट्रीय विचारांचा पूर्ण अभाव असतो. भारतात हिंदू धर्माबरोबरच इतर धर्मांचे लोक राहतात,पण धर्माचरणाबरोबरच भारताचा राष्ट्रीय विचार पण विचारात घ्यायला हवा,नाहीतर गडबड होताना आपण बघतोच आहोत. राष्ट्रीय विचारधारा प्रवाही ठेवायची असल्यास अश्या राष्ट्रीय चर्चचा उपयोग होऊ शकतो. अर्थातच तत्कालीन सरकारला 1947/50 साली अश्या कुठल्या धार्मिक गोष्टीत दखल करणे उचित वाटले नाही. पण मुद्दा अजूनही अमलात आणण्यासारखा आहे असे मला तरी वाटले.

VKIC मध्ये नेमके काय काम चालते हे जाणून घेण्याची उत्सुकता पण होतीच. मीरा दीदीनी त्याची मांडणी खूप समर्पक शब्दात केली. ईशान्य भारतात 300 हून अधिक जनजाती आहेत. आज पर्यंत त्यांचा अभ्यास आणि डॉक्युमेंटेशन झाले ते मुख्यतः त्या त्या जनजातीची वैशिष्ट्ये, परंपरा, वेगळेपण काय अश्या दृष्टिकोनातून झाले. पण त्यामुळे प्रत्येक जण वेगळा ही भावना पण बळवली गेली. पण ह्या सगळ्या जनजाती गेली अनेक शतके एकत्र, एका प्रांतामध्ये गुण्या गोविंदानी नांदत आहेत. म्हणजे त्याना जोडणारे, एकत्र ठेवणारे सामाईक धागे पण नक्की असले पाहिजेत. त्यांचा अभ्यास फारसा झालेला नाही. VKIC मध्ये अश्या अनेक जनजातींना जोडणाऱ्या गोष्टींचा अभ्यास प्रामुख्याने होतो,  आणि थोडी थोडकी नव्हे तर सलग 25 वर्षे हे चालू आहे. या पूर्वीच्या माझ्या ईशान्य भारतातल्या 3 फेऱ्यानमध्ये विवेकानंद केंद्राच्या अनेक शाळांमध्ये जायचा योग आलेला आहे. पण केंद्र अश्याही प्रकारचे काम करते हे कधी समजले नव्हते. 

साधारण 10 वाजता vkic मधून बाहेर पडलो तेव्हा नव्याने कळलेल्या अनेक गोष्टी आणि विचार डोक्यामध्ये होते. ईशान्य भारतात आल्यावर ब्रम्हपुत्रा नदीचे किमान दर्शन तरी घ्यायचेच असते...भाडीपाच्या भाषेत सांगायचे तर , ...शास्र असतं ते...ब्रह्मपुत्रा नदीचे पात्र इतके रुंद आहे की त्यामध्ये अनेक मोठी बेटे सुद्धा आहेत. त्यापैकी गुवाहाटी शहरामध्ये असलेले उमानंदा हे एक बेट. फेरी बोटीतून तिथे जाता येते. पण आमचा योग नव्हता. आज 11 नंतरच फेरी बोट सुरू होणार होती. मग आमचा मोर्चा आसाम स्टेट म्यूझियमकडे वळवला. आसाम राज्याबरोबरच ईशान्य भारतातील संस्कृती दाखवणारी अनेक दालने इथे आहेत. जुन्या मूर्ती, हत्यारे, कपडे, भांडी, भूर्जपत्रे, चित्रे, पारंपरिक घरे – सगळेच ! प्रत्येकासमोर नेटक्या शब्दात लिहिलेली माहिती. “हे काय दगड धोंडे बघत बसायचे” असे म्हणणारा मी पण तिथे रेंगळलो. पुढच्या प्रवासाची वेळ जवळ आल्याने दीड तासानंतर बाहेर पडावेच लागले. ज्यांना अशी संग्रहालये बघायला आवडतात त्यांनी गुवाहटीत मुद्दाम वेळ ठेवावा. बरीच छोटी मोठी म्यूझियम/ संग्रहालये आहेत इथे.

बाहेर पडून थोडी पोटपूजा करून कल्याण आश्रमाच्या कार्यालयात परतलो. मी आणि साकार पुण्याकडे जाणारे विमान पकडण्यासाठी विमानतळाकडे निघालो. स्वप्नील उद्या सकाळी मेघालयात जाणार आहे. पुढचे 4 दिवस मेघालय भटकंती, काही लोकांना भेटणे, काही शाळा बघणे असा त्याचा बेत आहे.

विमानतळावरचे सोपस्कार बरेच सुरळीत पार पडले. दुपारी साडेतीन वाजता खऱ्या अर्थाने परतीचा प्रवास सुरू झाला. वाटेत पाटणा इथे 6 तासांचा थांबा होता. बिहार राज्यात पण पहिल्यांदाच आलोय ही जाणीव झाली आणि पाय आपोआपच विमानतळाबाहेर वळले. दीड -दोन किलोमीटर पायपीट करून मग गर्दीच्या ठिकाणी पोचलो. पुण्यात पोचायला रात्री बराच उशीर होणार होता त्यामुळे थोडे तहान लाडू भूक लाडू बरोबर बांधून घेतले आणि अंधार होण्यापूर्वी परत विमान तळावर दाखल झालो. मध्यरात्री नंतर विमान आकाशात झेपावले.

काय केले आम्ही गेल्या 11-12 दिवसात? खरे तर काहीच नाही. छोटे सायंटिस्ट प्रकल्पाचा एक भाग म्हणून एका शाळेमध्ये 8 वी आणि 9 वी च्या मुलांसाठी प्रयोगातून विज्ञान शिकवण्याची कार्यशाळा घेतली. नेमकेपणे सांगायचे तर दोघांनी मिळून 3 शाळांमधल्या 160 विद्यार्थ्यांसाठी मिळून 90 ते 120 मिनिटांची एकूण 16 सेशन घेतली. बस. पण आम्ही मात्र खूप शिकून आणि अनुभव घेऊन परत येतो आहे. महाराष्ट्रातून ईशान्य भारतात जाऊन काम करणाऱ्यांची खूप मोठी परंपरा आहेच, त्या परांपरेमध्ये आमचा यापुढे सहभाग कसा असेल? आणखी अनेकांना अशी प्रेरणा देण्यासाठी काय करावे लागेल? फक्त ईशान्य भारतच नव्हे तर अन्य राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्या जिल्ह्यांमध्ये विज्ञान शिक्षणाची ही चळवळ कशी पुढे नेता येईल? विचार सुरूच आहेत.

भानावर आलो तेव्हा विमानात घोषणा होती होती – Cabin crew, Prepare for landing

धन्यवाद

अमर परांजपे @ 28 एप्रिल 2022

ःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःः

रोजच्या लेखनाच्या शेवटी फक्त माझे नाव लिहिणे म्हणजे खरे तर बरोबर नाही. हे सगळे अनुभव घेत असताना स्वप्नील, साकार आणि मी असे तिघे कायम एकत्र होतो. लेखांबरोबर जोडलेले फोटो/ व्हिडीओ काढण्यात त्या दोघांचा वाटा माझ्यापेक्षा जास्ती आहे. तसेच मी नागालँडला जाऊ शकलो ते ज्ञान प्रबोधिनीतल्या अनेक सहकारी आणि मार्गदर्शकांमुळे. त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे! 

नागालँडमध्ये असताना रोजच्या रोज दैनंदिनी स्वरूपात मी लिखाण करत होतो. अर्थात मी काही सिद्धहस्त लेखक वगैरे नाही. जे झाले, जसे झाले तसे लिहिले असा एक हातोडा छाप माणूस मी. त्यातल्या शुद्ध लेखनापासून ते वाक्यरचनेपर्यंतच्या अनेक चुका दुरुस्त करणे, तरीही शैलीत ढवळाढवळ न करणे. तसेच ते लेखन वाचनीय होईल आणि मला काय म्हणायचे आहे ते नेमक्या शब्दात वाचकांपर्यंत पोचेल यासाठी प्रत्येक लेखावर संपादकीय हात फिरवण्याचे खूप किचकट काम रोज प्राची करते आहे. तिने स्वतः सुद्धा अनेकदा ईशान्य भारतात प्रवास केलेला आहे,ती स्वतंत्रपणे चांगले लिहू शकत असल्याने त्यातले बारकावे ती अचूकपणे हेरू  शकली. लेखकाला काय म्हणायचंय हे नीट पोचवण्यासाठी  संपादन गरजेचेच असते..त्यामुळे शब्दलेखन माझे आणि शब्दबद्धता प्राचीची असे आमचे जोडीकार्य गेले 12 दिवस सुरू आहे.

पडद्यामागचे हे काम खरंतर अवघड असते. रोज लेखन केल्याशिवाय झोपायचे नाही असे ती दटावत राहिल्यामुळेच  मी परत आल्यानंतर हे सलग  ब्लॉग लिहू शकलो....

आणि अर्थातच तुम्ही सगळे वाचक...तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय आनंददायी तर होतेच पण सुधारणा देखील सुचवत होते. मजा आली.

आज थांबतोय.

परत कधीतरी काही वेगळे अनुभव घेतले तर जरूर तुमच्या पर्यंत पोहोचवेन.

@अमर परांजपे

Comments

  1. खूप छान लेख आहेत

    ReplyDelete
  2. छान वाटले...

    ReplyDelete
  3. सुदूर पूर्वांचलात जाऊन घेतलेले गटकार्य अनुभव आमच्यापर्यंत पोहोचवण्याचे जोडीकार्य आवडले.

    ReplyDelete
  4. खुप सुन्दर वर्णन आहे

    ReplyDelete
  5. अतिशय छान लेखन,
    आपला प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन आनि कथा सांगण्याची शैली नेहमीच सारखिच भारी...

    ReplyDelete
  6. Khoop chan northeast madhil kahi prashn navyane kalale....mast ani sahaj shaili ajeebaat angavr yet naahi...tarihi tethil prasna babat kharach jaag aanate

    ReplyDelete
  7. One of the the best thing was I could here your voice and imagine your expressions while reading your blog :) After long time…

    ReplyDelete
  8. अमर व प्राची ईशान्य भारतातील अभ्यास दौरा घडवुन आणल्या बदल दिलसे धन्यवाद ,अमर एक हाडाचा शिक्षक ,संपुर्ण कुटुंब च शिक्षण कार्यास वाहुन घेतलेले ,सर्वच परांजपे कुटुंबा चे आभार व नमस्कार.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दिवस १ - पार्श्वभूमी

दिवस 3 - दिमापूर... आणि टेनिंग प्रवास

दिवस 5 – प्रयोगातली मजा, आणि सत्संगाचे प्रयोजन