दिवस ६ वा - निरीक्षणे.... विज्ञान प्रयोगातली!! जनजीवनातली!!

आता इथल्या दिनक्रमाची सवय झाली आहे. तरी सूर्योदय बघायचा राहिला होता अजून. त्यामुळे सकाळी 5 पूर्वीच बाहेर पडलो. नवीन रस्ता explore करत करत जाऊन सूर्योदय बघायचा बेत होता. कारण आमच्या राहत्या ठिकाणाहून सूर्योदय दिसत नव्हता.  नवीन दिशेला उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला जाऊन आलो. सूर्योदय अगदी थोडक्यात चुकला पण गावाचा नवीन भाग बघून झाला. रोज सकाळी किंवा संध्याकाळी बाहेर पडून गावाची एक दिशा बघून यायचे हे ही जणू काही ठरून गेलेले आहे. सूर्योदय बघण्यासाठी शाळेपासून चढ चढून गावाच्या मुख्य चौकात आलो आणि परत एक टेकडी चढून गेलो होतो. पण अजूनही पूर्ण गावाची व्याप्ती नजरेत येत नाहीये. छोट्या छोट्या वस्त्यांनी बनलेले हे गाव...लोकसंख्येच्या मानाने विस्तार फार.

परत आल्यावर उपासना, थोडा व्यायाम आणि चहापान नेहमीप्रमाणे झाले.

आज इथल्या सरकारी शाळेत सुद्धा जाऊन तास घ्यायचा असल्याने सुरुवातीला 9 ते 10:30  GHS मध्ये 8वी-9वी च्या वर्गात  आणि मग दुसरी शाळा असे आमच्या डोक्यात होते.

पण शाळेत गेल्यावर वेगळेच. 10वी च्या वर्गातच तास घ्या अशी विनंती आली. आमची तयारी होतीच. कुठलाही प्रयोग करत असताना निरीक्षण करता येणे हे महत्त्वाचे कौशल्य आहे. अर्थात निरीक्षण प्रयोगातच कशाला जगताना पण करणे गरजेचे आहेच की, अनेकजण करत असतात. पण कौशल्य म्हणून शिकले तर व्यापक दृष्टिकोन येतो. निरीक्षण म्हणजे काय, ते कसे करावे, अगदी चित्राच्या निक्षणापासून सुरुवात करून प्रयोगाच्या निरीक्षणपर्यंत अनेक पैलू यात समाविष्ट आहेत. तर निरीक्षण कौशल्याची ओळख करून देत काही प्रयोग करून घ्यायचे आणि शिकलेल्या कौशल्याचा वापर कसा होतो याचे प्रात्यक्षिक दाखवायचे असे आजचे नियोजन होते. त्यासाठी पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यात सुरू असलेल्या 'विकास मित्र' प्रकल्पाच्या निमित्ताने तयार झालेल्या निरीक्षण कौशल्य हस्त पुस्तिकेमधली काही पाने आम्ही अनुवादित करून आणलेली होती. या पानांच्या आधारे काही कृति मुलांकडून करून घेणे शक्य होणार होते. थांबा या पुस्तिकेचा फोटोच दाखवतो तुम्हाला.



काही लोकांना शंका आली असेल की हे काय मध्येच निरीक्षण कौशल्य वगैरे. पण विचार साधा आहे अगदी. आम्ही इथे 6 दिवस आलेलो आहोत. त्यामध्ये 30- 35 प्रयोग करून घेऊ, त्यावर चर्चा करू. पण ही तर सुरुवात असेल मुलांसाठी. इथून पुढे त्यांनी आपण होऊन प्रयोग करत राहावे अशी इच्छा नक्कीच आहे. मग त्यासाठी लागणारी काही प्राथमिक कौशल्ये पण मुलांना शिकवली पाहिजेतच ना. एका दिवसात कौशल्य शिकवून नाही होणार पण निदान त्याची तोंड ओळख तरी होईल. असे काही असते हे तरी मुलांना समजेल. ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत आजही ,आणि पूर्वी छात्र प्रबोधन मासिकाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या विविध शिबिरांमध्ये नेहमीच निरीक्षण कौशल्य सत्र असायचेच. त्याचा चांगला उपयोग होतो. तर मग विकास मित्रच्या किंवा छोटे सायंटिस्टच्या शिबिरांमध्ये देखील निरीक्षण कौशल्य शिकवले पाहिजे असा विचार गेले काही महीने प्रबोधिनीत आम्ही करत आहोत आणि मग 5 वी ते 7 वी मधील मुलांसाठी विज्ञान शिकण्यासाठी उपयुक्त काही कौशल्ये आणि त्यांचा वर्गवार अभ्यासक्रम आणि अभ्यास साहित्य करण्याचे काम पण सुरू आहे. येत्या शालेय वर्षात अनेक ठिकाणी ही कौशल्ये पूर्व माध्यमिक गटाला शिकवायची असे ठरलेले सुद्धा आहे.

सॉरी, सॉरी, थोडा वाहवत गेलो ना? आणतो आणतो गाडी रुळावर आणतो.

आमचा तास उत्तम झाला. आज 10 वीच्या वर्गावर दुसऱ्यांदा तास असल्याने प्रतिसाद वाढला होता. पण एक आश्चर्याची गोष्ट आढळली म्हणजे 10वी मधील मुलांना देवनागरी लिपी वाचता येत नव्हती. त्यांना 8वी पर्यंत हिंदी भाषा हा विषय असून सुदधा आणि किती वाचायचे होते तर भारताच्या नकाशात राज्य आणि राजधानी असे लिहिलेले होते तेवढेच. हा आजचा मोठा धक्का! असे का असेल? हिन्दी विषयी अनास्था की आणखी काही? असो, सगळ्याच प्रश्नांची उत्तरे लगेच कशी मिळणार ? हाच नाही बरेच प्रश्न आहेत इथे आल्यापासून आणि माझी याबाबतची सगळीच निरीक्षणे बरोबर तरी कशी असतील.. टिपत रहायचे , कुठेही 10 दिवसात गाव फिरून होईल, प्रयोग शिकवता येतील, मुळातले प्रश्न समजून घेता येतीलही थोडेफार.. पण सोडवायचे तर वरवर जाऊन नाही चालत. तिथे त्यांच्यातले होऊन मुक्काम ठोकत ,तिथेच सातत्याने काम करावे लागते वर्षानुवर्षे...आणखी खोलात जायचे तर परत यावे लागेल इथे.

 

10:30  वाजता आम्ही तिघे, इथले विज्ञान शिक्षक श्री. Iganglu (मुद्दामच इंग्रजीत लिहिले, मी वापरत असलेल्या मराठी के बोर्डवर याच्या उच्चारप्रमाणे शब्द उमटत नाहीये !!) आणि आणखी 2 जण असे सरकारी माध्यमिक शाळेत गेलो.  शाळेत 6वी ते 10वी ची मिळून अवघी 40 मुले, 5 शिक्षक! शाळेला भले प्रचंड auditorium, चारपाचशे मुले बसू शकतील एवढे, पुढे स्टेज वगैरे असलेले. आणि आमचा तास तिथे योजलेला. 




सर्व शिक्षक पण आवर्जून बसलेले पूर्ण वेळ. आणि थोड्या प्रयत्नानंतर सहभागी पण होत होते. हा ही नवीन अनुभव. इतर ठिकाणी मुले ताब्यात देऊन शिक्षक पसार होतात. 


इथे एकदाच तास घ्यायचा असल्याने वेगवेगळ्या संकल्पना उलगडून दाखवता येतील असे प्रयोग मुद्दामच निवडले होते. जवळ जवळ दोन घडयाळी तास एवढा वेळ सगळी मुले आणि शिक्षण सुद्धा रंगून गेलेले होते. अगदी straw पासून पिपाणी बनवून ती वाजवून बघायची आणि मग त्याची लांबी आणि आवाज यात नेमके काय नाते आहे हे शोधायचा प्रयत्न करायचा असा प्रयोग पण शिक्षकांसकट सगळ्यांनी केला. मजा आली. 

शाळेसाठी म्हणून छोटे सायंटिस्टच्या 2 पुस्तिका, फोल्डस्कोप हे सयंत्र (फोल्डस्कोप हा एक सूक्ष्मदर्शक आहे. वरवर पहाता एखादे कागदी पाकिट वाटावे असा. याबद्दल तपशीलवार माहिती पुन्हा कधीतरी. तूर्तास फोटो अपलोड करतो. ) आणि त्याचे manual आणि ज्ञान प्रबोधिनीचे माहितीपत्रक भेट दिले. अर्थातच सगळी मुले, शिक्षक आणि आम्ही असा एकत्र ग्रुप फोटो पण काढला.

परत GHS शाळेत आलो,म्हणजे आमच्या रोजच्या शाळेत. अजून त्या चर्चच्या शाळेत सदिच्छा भेट द्यायची असे डोक्यात होतेच. शाळेच्या उपमुख्याध्यापिक तलामसी मॅडमना परत एकदा विनंती केली. पण त्या अगदीच reluctant होत्या म्हणून मग नाद सोडून दिला. उद्या शनिवार, शाळेला सुट्टी असते. पण तरी 8वी आणि 9वी ची मुले आमच्या तासांसाठी आनंदाने शाळेत येणार आहेत.

दुपारी थोडी झोप, लाईट आल्याने मोबाईल,पाँवर बँक,  प्रोजेक्टर इत्यादी चार्ज करणे हा अग्रक्रम होता. आपल्याकडे कसे काही ठिकाणी पाण्याचा टँकर आला की रांगा लागतात तसेच इथे लाईट आले की सर्व devices चार्ज करण्यासाठी रांगेत ठेवावी लागतात. आमच्या खोलीत एकच पॉइंट असल्याने, छात्रावासात जिथे कुठे मिळेल तिथे जाऊन चार्जिंगला लावायला लागते आहे.

4 नंतर बाहेर पडलो. उद्याच्या रसायन शस्त्रातल्या प्रयोगांची तयारी करताना लक्षात आले की लिंबू आणलेले नाही, पुण्यापासून कशाला न्यायचे, तिथे मिळेल की अशी चर्चा झाली होती. निवासातल्या स्वयंपाकघरात लिंबू नाही मिळाले. गावात मिळेल असे म्हणून निघालो. पण छे, आख्या गावात लिंबू नाही, वापरतच नाहीत.(आता त्यांना क जीवनसत्त्व कशातून मिळते, त्यासाठी ते कोणते पदार्थ जेवणात घेतात वगैरे प्रश्न आलेच ना मनात.. जेवणातील आहार घटकांबाबत वेगळाच लेख होईल ते सध्या राहूदेत ) आमच्या कल्पनेप्रमाणे लिंबू घेऊन प्रयोग समजावून सांगणे, करणे हे अगदी स्वैपाकघरातील रसायनशास्त्र.. पण लिंबू नाही.. बोला आता?? समस्या परिहार करणे आलेच. व्हिनेगर वापरता येईल अशी सूचना head quarter कडून आली. पण ते पण मिळेना. शेवटी लेमन ज्यूस मिळाला. त्याने प्रयोग होतो का हे बघावे लागणार आहे.

लेमन ज्यूसच्या शोधात ज्या दुकान /हॉटेल मध्ये गेलो तिथल्या महिलेला हिंदी/ इंगजी काहीच येत नव्हते. पण सुदैवाने अजून एक माणूस तिथे आला आणि आमचा भाषेचा प्रश्न मिटला. बघून तरी तो माणूस नागा किंवा ईशान्य भारतातील वाटत नव्हता. म्हणून सहज विचारले की कुठून आलात? आणि गप्पांना सुरुवात झाली. बंगाल मधून याची बदली इथल्या स्टेट बँकेच्या शाखेत झाली होती. झाली नव्हती, याने नागालँड मागून घेतले होते, का तर ईशान्य भारतात जास्तीचा North east allowance मिळतो आणि त्यात परत डोंगरी भागात शाखा असेल तर अजून जास्ती. एकूण काय तर पुण्यासारख्या शहरापेक्षा जवळ जवळ दुप्पट पगार. याच्या डोक्यात कोहीमा, दिमापूर असेल पण  याला कोहिमा वगैरे ऐवजी टेनिंग शाखा मिळाली. गेली जवळ जवळ साडेतीन वर्ष इथे राहतो आहे. तसा रोजचा खर्च फार कमी..नागामीज उत्तम बोलत होता. परिसरातल्या 25-30 किमी मधली ही एकमेव बँक असल्याने कामाचा बराच ताण कसा आहे, रोखीचेच व्यवहार जास्ती कसे होतात वगैरे वगैरे माहिती मिळाली. छोटे छोटे पण जास्ती संख्येने होणारे व्यवहार, deposit वगैरे फारशी नाहीत. अशी टिपिकल बँक अधिकाऱ्याबरोबर व्हावी ती चर्चा झाली, माहिती मिळाली. कोकणातल्या अतीदुर्गम खेडेगावात बदली झाली तर असाच कोकण टेरेन अलाऊंन्स मिळत असेल का? मला उगीचच पडलेला प्रश्न... तर आम्ही होतो या टेनिंगच्या बँक अधिकाऱ्यासोबत.

 चर्चचे खाते याच बँकेत असेल ना? त्यात होत असतील की मोठे व्यवहार? असा प्रश्न मनात आलाच. पण ते विचारणे योग्य दिसले नसते आणि विचारले असते तरी त्याने सांगितले नसते... असो.

 घर भाड्याने घेऊन राहतो आहे, आणि माझे घर उत्तम आहे कारण घरात नळ आहे असे त्याने सांगितले. “माझ्याकडे मोटर सायकल आहे आणि कधीकधी शनिवार रविवार मी मोटर सायकल चालवत जाळुकी ला जातो.” बापरे, त्या तसल्या रस्त्याने हा बाबा मोटर सायकलने जातो. धन्य!! बाकी पण पुष्कळ गप्पा झाल्या. शेवटी नाव विचारले - अरिंदम, आडनाव विचारायचेच राहिले, घोष ,बोस वगैरे असेल काहीतरी. अचानक झालेली भेट पण एक वेगळे विश्व ऐकायला मिळाले. नाहीतर एरवी कधी इथल्या बँकेत जाऊन तिथल्या कोणाशी बोलणे झाले नसतेच. इथल्या स्टेट बँकेत जाऊन 100 रुपये डिपाँझिट करून बघावे असा विचार मनात येऊन गेला. जाऊदेत. हे असं होतंय..दिवस पुढं सरकतोय आणि मी रेंगाळतोय मागेच. विचार आणि लेखन गती जुळत नाहीत सध्या.

बाहेर पडलो तेव्हा 5 वाजायला आलेले. दिमापूरहून सकाळी 6 वाजता निघालेली नागालँड स्टेट ट्रान्सपोर्ट (nst) ची बस नुकतीच टेनिंग मध्ये पोचली होती. त्यातले सामान उतरवणे चालू होते. एक च बस आज दिमापूर टेनिंग आणि उद्या परतीचा प्रवास करते. म्हणजे एक दिवस आड बस टेनिंग मध्ये येते.


नंतर फिरत फिरत गावाच्या अजून न पाहिलेल्या दिशेला गेलो. ती चर्चची शाळा निदान बघूया तरी असे डोक्यात होते. बरीच लांब होती, पण दिसली. टुमदार शाळा आहे, समोर मोठे क्रीडांगण आणि रस्त्याच्या समोरच्या बाजूला वसतिगृह. आज दर्शन झाले, भेट कधी होते बघूया! आमचेही दर्शन त्यांना झाले असावे. कारण आम्ही वळत असतानाच एक मुलगा warden ला बोलावून घेऊन आलेला आणि आमच्याकडे बोट दाखवून काहीतरी सांगत असलेला आम्ही ओझरता पहिला होता. कुडता किंवा झब्बा घातलेली दोन माणसे चर्चच्या शाळेजवळ स्पॉट झाली तर !!!


रात्रीचे जेवण राजुजींच्या घरी ठरले होते. त्यांच्या पत्नी सौ. आबून  या पण शाळेत शिक्षिका आहेत.  आबूनताईंनी  झक्कास बेत केलेला होता. फुलका, पनीरची भाजी, भात, वरण आणि पापड.. वाह ! 

17 तारखेला पुणे सोडल्यावर आजच पोळी खायला मिळाली. माझे खाण्याचे नखरे नाहीत हे आमच्या घरी पूर्ण मान्य आहे. तरी पण रोज अगदी थोडा भात खाणारा मी सुखाने इथे आल्यापासून रोज तिन्ही त्रिकाळ भात खातोय. तक्रार नाही पण शेवटी फणस तो फणस  आणि हापूस तो हापूसच !! मला म्हणायचंय ते हे की भात तो भात आणि फुलका तो केवळ फुलकाच... भरपेट जेवण झाले आहे. त्यामुळे आता अजून काही लिहिणे अवघड आहे. निरीक्षण कौशल्य शिकवलेच पण आज दिवसभर वापरही भरपूर केला मी. आता मात्र मला झोप आलीय हे माझं बिनचूक निरीक्षण आहे कारण टायपिंगला अक्षरं धुसर होत चाललीयत... आणि मनाच्या पातळीवर टेनिंग स्पष्ट होत चाललंय.

 

अमर परांजपे @ 22 एप्रिल 2022

Comments

  1. शिकवायचे म्हणून शिकवणे नसले की मग का करायचे, कशासाठी करायचे, कसे करायचे असे सगळे एकत्रित घेतले जाते... आणि खरंतर एखाद्या गोष्टीचे ज्ञान होणे म्हणजे हेच ना... नाहीतर मग फक्त माहिती मिळेल.

    ReplyDelete
  2. Tremendous passion of educational teaching is noted every now and th
    an ,in writing, thinking and in practical action keep it up Amarji....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दिवस १ - पार्श्वभूमी

दिवस 12 – समारोप

दिवस 3 - दिमापूर... आणि टेनिंग प्रवास