दिवस 4 – टेनिंग --प्रत्यक्ष विज्ञान कार्यशाळेला सुरुवात

काल रात्री 2 च्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. लाईट पण गेले. पावसामुळे थंडी पण वाढली. टेनिंग हे समुद्र सापाटीपासून साधारण 6000 फुट उंचीवर आहे. म्हणजे कुठल्याही हिमालयीन हिल स्टेशन एवढे. लोकसंख्या नेमकी माहिती नाही पण 3000 वगैरे असेल. गाव बरंच पसरलेलं आहे. आम्ही आहोत ते टेनिंग टाऊन. थोड्या अंतरावर टेनिंग व्हिलेज म्हणून पण आहे. काल रात्री झोपायला उशीर झाला होता आणि प्रवासातला रस्ता कसा होता हे तुम्ही वाचलेच. पण त्यामुळे सकाळी एकदम जाग आली तेव्हा छात्रावासातल्या मुलांचे प्रातः स्मरण सुरू होते. म्हणजे खरंतर आम्हाला उठायला अंमळ उशीरच झालेला..सकाळचे सव्वा पाच वाजलेले. सकाळचे म्हणतोय कारण लख्ख उजडलेलं होतं. आपल्या इथले पहाटेचे सव्वा पाच वाजतात...ईशान्य भारतात पहाटे फार लवकर उजाडते आणि रात्री लवकर अंधार पडतो..(अर्थात ही आपण रहातो त्या भागानुसार केलेली तुलना ) मुलांचा दिनक्रम पण नेहमीपेक्षा वेगळा आहे. पहाटे 5 वाजता प्रातः स्मरण , 6 वाजता चहा , 7 पर्यंत अभ्यास , 7 ते 8 स्वच्छता आणि इतर कामे , 8 वाजता जेवण (हो जेवण , न्याहारी नव्हे) , 8:30 ते 1:30 शाळा , दुपारी 2:30 ला न्या...