दिवस २ - पुणे-मुंबई -दिमापूर प्रवास

पुणे - मुंबई प्रवास सुरळीत पार पडला. Express way वरती पुरेसे जास्ती ट्रॅफिक असून सुद्धा पहाटे अडीच वाजताच मुंबई विमानतळावर पोचलो. 

चेक इन काउंटरवर गेल्यावर कळले की वेब चेक इन करणे अत्यावश्यक आहे. मग परत आमची वरात  माघारी - वरात असे म्हणायला कारण की, आम्ही तिघं आणि आमच्या 9 बॅगा.. नागालँड मध्ये कुठल्या वस्तू मिळतील याची खात्री नसल्याने प्रयोगाला लागणारे सर्व सामान पुण्यातूनच न्यायचे असे ठरले. त्याप्रमाणे प्रयोगाच्या सामानाच्या 3 बॅगा, मग शिवाय तिथे काम करणाऱ्या मराठी आणि अमराठी लोकांसाठी घेतलेला खास महाराष्ट्रीय खाऊ (ही खास अजितरावांची सूचना)आणि ज्ञान प्रबोधिनीच्या प्रकाशित पुस्तकांपैकी काही प्रती (ही प्रशांतसरांची सूचना)!! त्यामुळे एकूण 9 डाग!! (यामध्ये आमच्या तिघांचे वैयक्तिक कपडे, सामानही होतेच )

वेब चेक इन करून परत काउंटरवर गेल्यावर कळले की माणशी एकच बॅग चेक इन केलेली चालते. आणि आम्हाला 3 जणांमध्ये 6 बॅगा द्यायच्या होत्या. मग काय.. ज्ञान प्रबोधिनी, छोटे सायंटिस्ट प्रकल्प, नाssगाssलँड मधले Science workshop हे सगळे किती महत्त्वाचे आहे हे तिथल्या अधिकारी व्यक्तीला समजावून देण्याशिवाय पर्याय नव्हता. अखेर त्याला समजावले.. त्याला समजले असावे किंवा निदान पहाटे पहाटे आणखीन lecture ऐकायला लागू नये म्हणून का होईना त्यांनी सगळ्या बॅगा स्वीकारल्या. अर्थात सगळया बँगा  मिळून वजनाच्या मर्यादेमध्ये बसत होत्याच. बॅगा एकदाच्या त्यांच्या ताब्यात गेल्यावर आम्ही हुश्श झालो. पण सुरळीत होईल तो विमान प्रवास कसला!! आमचे विमान नेमक्या कुठल्या फलाटाला लागणार आहे (सॉरी सॉरी कुठल्या गेट वरून निघणार आहे असे म्हणायचे होते) ह्याबद्दल गोंधळ. बोर्डिंग पासवर 11 लिहिले होते, स्क्रीन वर 21 दाखवत होते. आम्ही गेलो 21 कडे, लॅपटॉप पासून घडाळ्यापर्यंत सगळ्यांचे स्कॅनिंग झाले. 21 नंबरपाशी जाऊन बसलो आणि मोबाइलवर मेसेज आला की विमान 12 नंबर वरून उडणार आहे.  याआधी अनेकदा विमान प्रवास केला असला तरी अशी वेळ पहिल्यांदाच आल्याने काय करावे कळेना, पण सुदैवाने आमच्या सारखे अजून 50 एक लोक तरी होते. मग आमची वरात 12 नंबर कडे. दोन्ही गेटमद्धे साधारण अर्धा किमी अंतर. पण वेळ खूप असल्याने आम्ही मजेत होतो  शिवाय विमान कंपनी आणि सुरक्षा अधिकारी यांच्यातले सुखसंवाद एन्जॉय करत होतो.

असो, अखेर विमानात बसलो,  बसलो कसले झोपलो. विमान कधी उडाले हे कळले पण नाही. पण इथे ही धक्के बसायचे होते. फक्त यावेळी सुखद!

अनपेक्षितपणे विमानात खायला मिळाले, ते पण फुकट!  एअर होस्टेसने अक्षरशः झोपेतून उठवून खायला लावले म्हणालात तरी चालेल. तिकीट काढणाऱ्याची ही कृपा असावी. धन्यवाद पूर्वा ताई !

एकूण काय तर दिल्ली मार्गे अगदी वेळेत आम्ही दिमापूर विमानतळावर उतरलो. पुण्यातल्या  चाळीस पारा तापमानातून आल्यावर,  दिमापूर मध्ये दुपारी 1 वाजता पण आल्हाददायक हवा आणि वीसच्या आसपास तापमान हा विलक्षण अनुभव होता. विमानतळावरच मग ह्या दौऱ्यातला पहिला सेल्फी काढला. 

नंतर अर्थातच रिक्षावाल्याशी हुज्जत वगैरे सोपस्कार पार पाडून आणि दिमापूर शहरातले खास रस्ते अनुभवत (ईशान्य भारतातल्या रस्त्यांना त्यांचं असं खास वैशिष्ट्य आहे,ते सांगेनच नंतर) दिमापूर शहराच्या थोडसं बाहेरच्या अंगाला 'सिग्नल अंगामी व्हिलेज'  इथं  "जनजाती विकास समिती, नागालँड" च्या कार्यालयात पोचलो.(वनवासी कल्याण आश्रमाचे हे नागालंँड मधील शाखेचे नाव )

दोन एकराच्या परिसरात हे कार्यालय आहे,प्रशस्त आहे. स्वतंत्र इमारत, मोठं मैदान आणि छोटासा तलाव. दुमजली असलेल्या या इमारतीत वरच्या मजल्यावर वीस मुलांचा छात्रावास आहे. याशिवाय  पंचवीस कार्यकर्ते राहू शकतील अशी व्यवस्था आहे.  व्यवस्था अतिशय चोख, शिस्तबद्ध तरीही आपुलकीने भरलेली आहे.

दुपारचे जेवण करून (इथून पुढे जेवण म्हणजे भात वरण आणि उकळलेल्या/ उकडलेल्या भाज्या हे गृहीत धरावे. काही वेगळे खाल्ले तर नमूद करेनच.) थोडी झोप काढून प्रवासाचा शीण घालवला. 

संध्याकाळचा वेळ छात्रावासातल्या मुलांबरोबर प्रार्थना, कार्यकर्त्यांबरोबर गप्पा, नागालँडच्या नकाशाचा अभ्यास आणि दुसऱ्या दिवशीच्या नियोजनात गेला. आजच्या 3000 किलोमीटरच्या प्रवासापेक्षा उद्याचा 130 किलोमीटर प्रवास जास्ती इंटरेस्टिंग असणार आहे याची जाणीव इथल्या लोकांच्या बोलण्यातून व्हायला लागली. शेवटी गूगलला माहिती नसलेल्या रस्त्यावरूनचा प्रवास करायचा म्हणजे काय ना!! ....अहो ,हल्ली काही हवं असेल तर गुगल कर च्या जमान्यात गुगलला रस्ताच माहिती नाही हे जरा हटके वाटतंय ना.. थोडा धीर धरा. उद्या लिहितोच त्या प्रवासाबद्दल...तूर्तास मच्छरदाणी नीट खोचून घेतो..डासभाऊंचे गाणे अगदी कानात नको.. मैफील दुरूनच ऐकलेली बरी....

अमर परांजपे @18 एप्रिल 2022

Comments

  1. वाह!!!
    वाट बघत आहे... नागालँड कधी सुरु होतय याची

    ReplyDelete
  2. Excited for next journey...

    ReplyDelete
  3. विजय निकमApril 29, 2022 at 8:30 AM

    वाह सुरवात तर एकदम छान.. पुढचा प्रवास कसा याची उत्सुकता आहे

    ReplyDelete
  4. नमस्कार सर.रेखीव वर्णन..स्वतः गेल्यासारखं वाटत आहे.खूप छान सर...प्रतीक्षेत...

    ReplyDelete
  5. पुढचे अनुभव आणि प्रवास वर्णन वाचायला उत्सुक आहोत

    ReplyDelete
  6. मज्जा येतीये वाचायला....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दिवस १ - पार्श्वभूमी

दिवस 3 - दिमापूर... आणि टेनिंग प्रवास

दिवस 5 – प्रयोगातली मजा, आणि सत्संगाचे प्रयोजन