दिवस 4 – टेनिंग --प्रत्यक्ष विज्ञान कार्यशाळेला सुरुवात
काल रात्री 2 च्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. लाईट पण गेले. पावसामुळे थंडी पण वाढली. टेनिंग हे समुद्र सापाटीपासून साधारण 6000 फुट उंचीवर आहे. म्हणजे कुठल्याही हिमालयीन हिल स्टेशन एवढे. लोकसंख्या नेमकी माहिती नाही पण 3000 वगैरे असेल. गाव बरंच पसरलेलं आहे. आम्ही आहोत ते टेनिंग टाऊन. थोड्या अंतरावर टेनिंग व्हिलेज म्हणून पण आहे.
काल रात्री झोपायला उशीर झाला होता आणि प्रवासातला रस्ता कसा होता हे तुम्ही वाचलेच. पण त्यामुळे सकाळी एकदम जाग आली तेव्हा छात्रावासातल्या मुलांचे प्रातः स्मरण सुरू होते. म्हणजे खरंतर आम्हाला उठायला अंमळ उशीरच झालेला..सकाळचे सव्वा पाच वाजलेले. सकाळचे म्हणतोय कारण लख्ख उजडलेलं होतं. आपल्या इथले पहाटेचे सव्वा पाच वाजतात...ईशान्य भारतात पहाटे फार लवकर उजाडते आणि रात्री लवकर अंधार पडतो..(अर्थात ही आपण रहातो त्या भागानुसार केलेली तुलना )
मुलांचा दिनक्रम पण
नेहमीपेक्षा वेगळा आहे. पहाटे 5 वाजता प्रातः स्मरण, 6 वाजता चहा, 7 पर्यंत अभ्यास, 7 ते 8 स्वच्छता आणि इतर कामे, 8 वाजता जेवण (हो जेवण, न्याहारी नव्हे), 8:30 ते 1:30 शाळा, दुपारी 2:30 ला न्याहारी, मग 3 ते 4 खेळ, शाळेतून आल्यावर किंवा खेळून झाल्यावर अंघोळ, 5 वाजता सायं प्रार्थना, संध्याकाळी 6:30 वाजता जेवण, मग अभ्यास आणि 9 वाजता झोप.
सकाळी
सकाळी शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ. तलामसीजी आणि अन्य काही शिक्षक यांच्याबरोबर
गप्पा आणि एकंदर नियोजनाबद्दल चर्चा झाली. Zeliangrong Harakka School
(ZHS) असे शाळेचे नाव आहे. Zeliang
हे ह्या प्रांताचे नाव आहे. हा प्रांत नागालँड, आसाम आणि मणीपुर अश्या तीनही राज्यात पसरलेला आहे. ह्या
प्रांतात Harakka जमातीचे लोक मुख्यतः आहेत. टेनिंग गावात ह्या शिवाय एक
सरकारी हायस्कूल, एक
बाप्टिस्ट चर्चने चालवलेले हायस्कूल आणि
एक कॅथॉलिक चर्चचे हायस्कूल अश्या 3 शाळा आहेत. सर्वच शाळांत आम्ही सत्र घ्यावीत
असा आग्रह इथले कार्यकर्ते शिक्षक श्री. देवप्रियदास उर्फ राजुजी यांनी धरला आहे.
आम्हीही होकार दिलाय. पुढचे नियोजन तेच
करणार आहेत.
आमचे सकाळचे जेवण 8:30 ला झाले. आम्हाला शाळेत 11 वाजता बोलवलेले होते. म्हणून मग राघूनंदनजी यांच्याबरोबर फिरायला बाहेर पडलो. JVSN च्या दिमापूर कार्यालयात व्यवस्थापक म्हणून काम करणारे श्री थांगसे यांचे घर टेनिंग मध्येच आहे. घराचे बांधकाम सुरू असल्याने ते काही दिवस सुट्टीवर टेनिंग इथेच होते. त्यांच्या घरी जाऊन आलो. जाता येता बाकी गाव बघणे झालेच. गाव कसं आहे ते साधारण थोडक्यात सांगतो पुढच्या लेखांमधे.
11
वाजता शाळेची मधली सुट्टी होते. त्यावेळी शिक्षक खोलीमध्ये सर्व शिक्षकांशी ओळख
झाली. 11:30 वाजता 8वी च्या वर्गातले सत्र सुरू केले. मी ब्लॉग लिहितोय खरा पण अनेकांना
आम्ही नेमके काय शिकवायला टेनिंग, नागालँडला गेलो होतो हा प्रश्न पडला असणार आहे. ज्ञान प्रबोधिनीने
10 वर्षापूर्वी छोटे सायंटिस्ट या प्रकल्पाला सुरुवात केली. ज्ञान प्रबोधिनी
प्रशालेचे माजी प्राचार्य आणि शैक्षणिक उपक्रम संशोधिकेचे (हा ज्ञान प्रबोधिनीतील
एक विभाग आहे) त्यावेळचे प्रमुख कै.
विवेकराव पोंक्षे सरांच्या संकल्पनेतून छोटे सायंटिस्ट प्रकल्प सुरू झाला. मुलांनी
स्वतःच्या हातानी विज्ञान प्रयोग केले पाहिजेत आणि असे प्रयोग करत करत एकीकडे
विज्ञानामधील संकल्पना शिकल्या पाहिजेत तर दुसरीकडे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित
झाला पाहिजे असे या प्रकल्पाचे उद्दिष्ट. अर्थातच अनेक शाळांमध्ये प्रयोगशाळा
नसतात किंवा असल्या तरी मुलांना तिथे जाऊन स्वतः प्रयोग करण्याची मुभा नसते.
त्यासाठी मग सहज उपलब्ध आणि कमी किमतीत मिळणारे साहित्य वापरून करता येण्यासारखे
प्रयोग हळूहळू विकसित केले गेले. Pressure, force, motion,
electricity, magnetism अश्या 8 वी -9 वी
च्या पाठ्यपुस्तकातील संकल्पनांवर आधारित प्रत्येकी 5-6 प्रयोग तयार झाले.
सुरुवातीला पुणे मनपा च्या शाळा, मग
पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी
तालुके असे करत प्रकल्पाचा विस्तार होत गेला. पहिल्या दिवशी लिहिल्याप्रमाणे देशभर
याचा प्रसार व्हावा असा आग्रह ज्ञान प्रबोधिनीचे सध्याचे कार्याध्यक्ष आणि kPIT कंपनीचे चेअरमन श्री.
रवी पंडित सरांनी धरला आहे. अनेक ठिकाणी छोटे सायंटिस्ट प्रकल्पांतर्गत कार्यशाळा, विज्ञान शिबिरे घेतली जातात. त्याचाच एक भाग म्हणून
टेनिंगच्या या शाळेमध्ये हे विज्ञान प्रयोग करून घेत मुलांना विज्ञान शिकवण्यासाठी
आम्ही इथे आलेलो आहोत हे मनात पक्के आहे. कोरोना नंतरचे पहिलेच वर्ष असल्याने 8 वी
आणि 9 वी च्या मुलांना 8 वी चेच प्रयोग दाखवायचे ठरवले आहे. या मुलांसाठी एकूण 6
सेशन / सत्र घ्यायचे नियोजन आहे.
तर इंग्रजी- हिन्दी अश्या भाषेत आमचा संवाद सुरू झाला. हो...मराठीत नाही बरंका..यहा तो हिंदी, अंग्रेजीही चलता है। फक्त विज्ञान चांगले असून इथे उपयोग नाही.. ते मांडायची, प्रयोग सांगायची भाषा, थोडक्यात आजच्या भाषेत सांगायचं तर कम्युनिकेशनसाठी शेवटी देहबोली, हावभाव, आणि भाषाच कामी येते.. सुरुवातीला हिंदीमधील विज्ञान गीताचा व्हिडियो दाखवला. तो सगळ्याना आवडला. ज्यांना आवडणार असेल त्यांनी खालील लिंक वर जाऊन ते नक्की बघावे. खरं सांगू का व्हिडीओ फक्त बघण्यापेक्षा त्यातले शब्द बारकाईने ऐका.. ज्ञान प्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री रामभाऊ डिंबळे यांनी लिहिलेल्या मूळ मराठी पद्याचा .."डोळे उघडून बघा गड्यांनो .." चा हिन्दी अनुवाद किंवा रसभावानुवाद..हो नवीन शब्द मुद्दाम वापरतोय कारण हा केवळ शब्दशः अनुवाद नाही तर मूळ मराठी पद्यातील रस आणि भावाचा हिंदीतील सुंदर पुनर्निर्माण आहे. हे हिंदी पद्य/ गाणे ज्ञान प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आणि सिद्धहस्त कवी श्री. ऋत्विक फाटक यांनी केलेला आहे.
https://youtube.com/watch?v=-RQt7zY6tUQ&feature=share
तर या पद्यात म्हंटल्याप्रमाणे “जो है जैसा वैसा क्यो है इसपर करो विचार” ही tagline धरून आम्ही पुढचे 6 दिवस ह्या विद्यार्थ्यांबरोबर असणार आहोत.
आज
pressure
(दाब) ह्या संकल्पनेवर आधारित प्रयोग
घ्यायचे होते. सुरुवातीला मुले जास्ती प्रतिसाद देत नव्हती पण प्रत्येकानेच प्रयोग
करायचा असल्याने हळूहळू सर्वजण वर्गात active झाले. फुगे, पाण्याची रिकामी बाटली, प्लॅस्टिक ग्लास असे साधे साधे साहित्य आम्ही पुण्याहून
घेऊन गेलेलो होतोच. एक ग्लास पाण्याने भरलेला तर दुसरा पाणी नसलेला. अर्थातच मुले
तो ग्लास रिकामा आहे असे उत्तर देतात. मग काहीवेळाने रिकामा नाही तर त्यात हवा आहे
असे उत्तर येते. मग हवा आहे ती सिद्ध करता येईल का? मग त्यासाठी एखादा प्रयोग. असे इतके सोपे विज्ञान... पण
इथेच नाही तर अगदी महाराष्ट्रातील नामांकित शाळेतही अनेक ठिकाणी मुलांना असा विचार
करायचा असतो हेच सांगितले गेलेले नसते. जिथे वैज्ञानिक विचार तिथे तो तसाच हवा
तिथे तो ग्लास रिकामा आहे, स्वच्छ
आहे,
काचेचा आहे या निरीक्षणांची किंवा भाषेच्या फुलोऱ्याची गरज
नसते..असो.
एकीकडे
8वी चे सत्र सुरू असतानाच 12:30 ला स्वप्नील ने 9वी चे सत्र सुरू केले. 1:30 वाजता
शाळा सुटली. पण प्रार्थनेनंतर पण 9वीची मुले उरलेले प्रयोग बघायला आणि करायला
थांबली होती.
एका
प्रयोगात पाण्याची टाकी, नळ वगैरे
उदाहरण द्यायला लागलो. मुलांचे चेहेरे कोरेच. मग लक्षात आले की छात्रावासात
पाण्याचा नळ नाही आणि गावात पण पाण्याची टाकी दिसली नाहीये. त्यामुळे मुलांच्या
घरी पण नळ असण्याची शक्यता कमी. सुदैवाने शाळेतच स्वच्छतागृहात नळ पहिला आहे असे
मुलांनी सांगितले आणि माझा जीव भांड्यात पडला!! खरंतर मला विज्ञान प्रयोग शिकवताना
ती मुलं त्यांचे अनुभवविश्व उलगडून दाखवत होती. थोडक्यात मी विज्ञानातील तत्वं समजावून देत होतो तर हीच तत्वं
त्यांना जगताना विज्ञान दाखवतील का ते मुलांच्या गप्पातून, शंकातून मीच समजून
घेत होतो.
दुपारी
3 नंतर चा वेळ मोकळा मिळाला. थोडे फिरून आलो. संध्याकाळचे जेवण मुलींच्या
छात्रावासात नियोजित होते. एक छोटी टेकडी पार केल्यावर किंवा टेकडीला वळसा घालून
गेल्यावर हे ठिकाण आहे. साधारण 23-24 मुली तिथे राहतात. त्यांच्याबरोबर ओळख, गप्पा आणि मग एकत्र जेवण असा कार्यक्रम झाला. आजूबाजूच्या
अनेक खेडेगावात हायस्कूल नाही आणि अंतर कमी असले तरी वाईट रस्ते आणि वाहतुकीच्या
साधनांचा अभाव यामुळे अनेक मुले मुली हॉस्टेल किंवा छात्रावासात राहतात. मुलींचा
दिनक्रम पण मुलांसारखाच असतो. येताना आमच्या बरोबर गाडीमध्ये एका पोत्यात सगळ्या
मुलींसाठी दप्तरे आणि पाण्याच्या बाटल्या आणलेल्या होत्या. त्याचे वाटप झाले. कलकत्त्याच्या
कोणी देणगीदारांनी हे सगळे पाठवले होते.
कोणी
खास पाहुणे आले की जेवणात nonveg असलेच
पाहिजे असा इथला संकेत आहे. त्यामुळे आमच्या समोर पण वरण-भात-भाजी बरोबरच वेगळ्या
प्रकारे केलेलं चिकन आलं. मी काही अट्टल nonveg खाणाऱ्यांपैकी नाही (नेहमी आपल्याकडे कोणी मला विचारले की nonveg खातोस का तर मी “हो खातो. पण बाहेरचे खात नाही आणि घरी करत
नाहीत” असे उत्तर देतो!! थोडक्यात फारच कमी वेळा nonveg खातो.) पण इथं खाऊन बघूया असे वाटले. उत्तम दर्जा आणि कमीतकमी
मसाला असे सांगली – कोल्हापूरकरांना आवडणार नाही असे इथले चिकन होते. तर्री, रस्सा,लाल
भडक तवंग याशिवाय चिकन लोकांना आवडत
नाही.. म्हणजे जनरली लोकांना मसाल्याची चव आवडते की खरंच चिकन आवडतं हा मला अनेक वर्ष पडलेला प्रश्न आहे. तर इथे
मात्र एकदम कमी मसाला आणि चिकनची मूळ चव शाबूत असलेलं चिकन खायला मिळालं. त्यामुळे
अर्थातच आवडलं असो.
जेवणानंतर.. फिकी चाय तो पिनी ही पडती है। फिकी चाय म्हणजे गरम पाणी आणि त्यात थोडी चहापत्ती, बाकी दूध साखर काही नाही. (थंडी असताना शरीरात पाणी कमी जाते त्यावर उपाय म्हणून अशी गरम पेय प्यायची पद्धत तयार झाली असावी).
काल रात्री गेलेले लाइट अजूनही
आलेले नसल्याने थोड्या अंधारातच जेवण पार पडले. नाही नाही candle
light dinner नाही. रत्नागिरीस उकडायचेच त्यात नवल ते काय..
तसंच रोजच लाईट जाणाऱ्यास कँडल लाईट डिनरचे कसले कवतिक...पण तरीही आम्ही
मेणबत्तीच्या प्रकाशात नव्हे तर चक्क साठवलेल्या सौर प्रकाशात जेवलो. कायमच लाइट
जात असल्याने अगदी प्रत्येक घरात सोलरवर चार्ज होणारे एक-दोन छोटे दिवे असतातच.
यामुळे मात्र सौर ऊर्जेच्या वापरात
नागालँड महाराष्ट्रपुढे आहे असे म्हणायला हरकत नाही.
परत
येताना सहज नजर आकाशाकडे गेली. अहाहा.. अगणित चांदण्यांनी भरलेले आकाश .. बघत
राहावे असे. आकाशनिरीक्षण प्रेमी मंडळी वेडी झाली असती. निरभ्र आकाश आणि आजूबाजूला
एकही लाईट नाही अशी दुहेरी पोषक स्थिती. सगळी नक्षत्रं, तारकापुंज, आकाशगंगा
सगळे सगळे एका वेळी जणू आकाशात अवतरले होते. अगणित, असंख्य म्हणजे काय ते कळावे इतके ते दृश्य विशेष!!! खास
आकाशदर्शन करायला पिरंगुटच्यापुढे किंवा कोयना परिसरात किंवा सांगलीजवळ दंडोबाला
जायची गरज नाही. या टेनिंग मधे ठरवले की फक्त वर बघायचा अवकाश.. अर्थात पाऊस नसेल
त्या रात्री.
निवासाच्या
ठिकाणी परत आलो तेव्हा साधारण रात्रीचे 8:30 वाजले होते. लाईट अजून आलेले नाहीतच.
मोबाइल पण आता मान टाकतील बहुदा. ( पॉवर बँक पण संपलेली आहे) तेव्हा हे चांदण्यांनो,ताऱ्यांनो खुशाल झगमगत रहा. आम्ही झोपतो. कारण तुम्ही झोपाल
तेव्हा आम्हाला ..खुली नजरसे देखो यारो म्हणत.. जो है जैसा वैसा क्यौ है यावर
विचार करत उद्याच्या ताऱ्यांबरोबर झगमगायचे आहे. गमतीचा भाग सोडला तरी विज्ञान
शिबिरात मुलांबरोबर मजा येतीय या विचारातच झोपून गेलो.
अमर
परांजपे@20 एप्रिल 2022








Great.....
ReplyDeleteअतिशय सुरेख पद्धतीने हा विषय आहे..
🙏🙏🙏👌👌👍👍🌷🌹
छान प्रवास चालला आहे ,सेवन सिस्टर बदल एकले होते अता अमर च्या सिद्धहस्त लेखणीतून माहिती करून घेणयाचाआनंद लूटतो आहे.
ReplyDeleteआता रंगत वाढत चालल्ये.
ReplyDeleteअमर सर, छोटे छोटे प्रयोगही विस्ताराने सांगा आम्हाला. दुसऱ्यांना समजावून द्यायला आम्हाला उपयोगी पडतील पुढे मागे
आता मज्जा येते आहे.... प्रवास वर्णन भारी एकदम आणि कामाचे पण.....
ReplyDeleteSahi bhari upakram ....pravas tr amhalahi ghadala ch ase vatat aahe...
ReplyDelete