दिवस 11– परतीचा प्रवास

काल रात्रीचा पाऊस पहाटे पहाटे थांबला आणि नेहमीप्रमाणे लक्ख दिवस उजाडला. पहाटे 6 वाजता निघायचे असे नियोजन होते त्यामुळे 5 पूर्वीच सगळे आवरून प्रातः स्मरणाला गेलो. आम्ही मुक्कामाला वापरत असलेली खोली पण नीट आवरून घेतली. कितीही नाही म्हंटले तरी गेले आठ दिवस हे आमचे घरच होते ना !  

तत्पूर्वीच इथल्या तत्पर संयोजकांनी आम्हाला चहा पण दिला. प्रार्थनेनंतर स्वप्नीलने मुलांशी संवाद साधला, त्यांना चॉकोलेट दिली आणि निरोप घेतला. अर्थात सगळ्यांबरोबर एक ग्रुप फोटो काढला हे आता सांगायला नकोच.



पावणे सहा वाजताच निवासातून निघालो, गाडी जिकडून सुटते तिकडे जायला. गाडी पण वेळेत आली. सगळे सामान वरती ठेवले त्यामुळे सुटसुटीत बसायला जागा मिळाली. सुरुवातीला गाडीत चालक आम्ही तिघे आणि एक मुलगा एवढेच होतो. 1-2 ठिकाणी आम्ही चालत्या गाडीतून च फोटो काढतो आहे हे पाहून त्याने गाडी थांबवली सुद्धा. 


झीरो पॉईंट, चांगराम, न्यू टेसेन असे गावागावात प्रवासी वाढत गेले. चालका शेजारी मी आणि स्वप्नील आणि मागच्या खिडकी मध्ये साकार अश्या खास जागा आम्हाला मिळालेल्या असल्याने रस्ता आणि आजूबाजूचे सहज दिसत होते. 

अर्थात रस्ता बघणे हे काही सुखावह नव्हतेच. 19 तारखेला आलो तेव्हा अंधारात नीट दिसलेले नव्हते. ओल्ड टेसेन गावानंतर एक अपघात झालेला पहिला. अखंड मोठा ट्रक रस्ता सोडून दरीत खोल घसरत गेलेला होता. तिथे झाडी इतकी दाट होती की ट्रक नीट दिसत पण नव्हता. पेरेन टाऊनच्या ऐवजी न्यू पेरेन मार्गे जालुकी कडे जाणाऱ्या शॉर्ट कट रस्त्याला लागल्यावर तर रस्त्याची परिस्थिती आणखीनच बिकट झाली.  आता रस्ता खूपच अरुंद पण होता. इतका वेळ कधी काळी केलेल्या डांबरीकरणाचे अवशेष तरी दिसत होते, आता ते ही दिसायचे बंद झाले.

 “एवढ्या अरुंद रस्त्यावर समोरून मोठी गाडी आली  तर काय करणार ?” असा प्रश्न चालकाला विचारला. ह्या रस्त्यावर मोठ्या वाहनांना परवानगी नाही असे तो सांगत असतानाच समोरून एक सामानाने भरलेला मोठा ट्रक आलाच. मग दोन चालकांची ... नाही नाही बाचाबाची वगैरे काही झाली नाही. एकतर्फी झाले काय ते. आमचा चालक त्या ट्रक चालकाला ओरडत होता आणि ट्रक चालक शांतपणे थांबून होता. थोडे मागे पुढे करून गाडी पार करायला जागा मिळाली आणि आम्ही पुढे सरकलो. पुढे रस्त्यावर अनेक ठिकाणी जड वाहनांना परवानगी नसल्याचे फलक झळकतात पाहिले. न्यू पेरेनच्या ADC (उपजिल्हाधिकारी) ऑफिस नंतर रस्ता बराच चांगला होता. थोडे पुढे आल्यावर जालुकी - पेरेन मुख्य रस्त्याला लागलो आणि हुश्श झाले. अचानक आठवण झाली की आपल्या मोबाईलला आता range  येऊ शकेल आणि खरंच की. 19 एप्रिलला संध्याकाळी 5 वाजता गेलेली range आज 27 एप्रिलला सकाळी 10 वाजता परत आली.  2003 मध्ये मोबाइल वापरायला लागल्यापासून इतका दीर्घ काळ range च्या बाहेर राहायचा पहिलाच प्रसंग.

सकाळी सव्वा दहाच्या सुमारास जालुकी टाऊन मध्ये पोचलो. जेवणासाठी गाडी थांबली. "आप लोग तो मीट खाते नही हो, अंडा तो खाते हो क्या?" असा प्रेमळ सवाल हॉटेल मालकिणीने केला आणि आम्ही आनंदाने होकार दिला. (इथे मीट म्हणजे मांसाहार असा घ्यायचा असतो आणि मग नागालँड मध्ये असल्याने मांसाहरामध्ये काय काय असते .. हे आम्हाला चांगलेच कळलेले होते!!)  मग आमच्या साठी वरण भाताबरोबर ऑम्लेट पण आले. 20-25 मिनिटांच्या विश्रांतीनंतर पुढचा प्रवास सुरु झाला. आता ऊन पण वाढले होते आणि हवेत पण उष्मा होता. एक दोन ठिकाणी प्रवासी चढ उतारा साठी थांबे झाले आणि सव्वा बारा वाजता आम्ही दिमापूरला पोचलो. आम्ही इतक्या लवकर पोचू हे कोणालाच अपेक्षित नव्हते. नेहमी किमान एक ते दोन वाजताततच. आम्ही नशीबवान!

जेवण झाल्यावर सगळी दुपार मोकळी होती. दिमापूर मध्ये बघण्यासारखे जे होते ते आधीच बघून झालेले होते.  जवळच खटखटी म्हणून गावात विवेकानंद केंद्राचे हातमाग - विणकाम प्रशिक्षण केंद्र असल्याचे ऐकले होते. रघूनंदनजींच्या कृपेने  कार्यालयातली दुचाकी मिळाली. मी आणि स्वप्नील तिकडे जायला निघालो. दिमापूर शहराचा वेगळा भाग बघायला मिळाला. शहर अजून संपले नव्हते एवढ्यातच एक कमान लागली आणि त्यातून पार झाल्यावर दुकानाच्या पाट्या असामी लिपीमध्ये दिसायला लागल्या. मग कळले की ती कमान म्हणजे नागालँड आणि आसाम राज्याची सीमा होती. आणि आम्ही आता आसाम मध्ये आलेलो होतो.

हायवे सुरू झाला, गुवाहाटी 282 किमी अशी पाटी पण दिसली. आणखी साधारण 10 किलोमीटरवर डावीकडे वळलो आणि विवेकानंद केंद्राच्या परिसरात पोचलो. शाळा आणि वीणकाम प्रशिक्षण केंद्र असे दोन्ही आहे तिथे. शाळा बंद होती. एकूणच परिसरात शुकशुकाट दिसत होता. तिथले प्राचार्य कन्याकुमारीला गेले असल्याचे कळले आणि आणखीन एका कार्यकर्त्यांचे लग्न असल्याने बाकीचे लोक तिकडे गेलेले होते. पण तिथले व्यवस्थापक भेटले. शाळा 2018 मध्ये सुरू झालेली आहे. बालवाडी ते पाचवी पर्यंतची मुले आहेत. दरवर्षी एक एक इयत्ता वाढत जाईल. वीणकाम प्रशिक्षण पण बंद असल्याचे कळले पण आतून फिरून बघता आले. तिथेच विक्री केंद्र पण असल्याने काही खरेदी पण करता आली.


साधारण 6 वाजता परत दिमापूर कार्यालयात पोचलो. महाराष्टात डोंबिवली आणि चिपळूण इथल्या छात्रवसात नागालँड मधली चाळीसेक मुले मुली राहतात. आज ती सगळी सुट्टी साठी परत येणार होती. त्यामुळे त्याची गडबड, तयारी, स्वयंपाक असे सुरु होते. आम्हाला स्टेशनवर सोडायचे आणि त्या मुलांना घ्यायचे असा बेत होता. साडे सात वाजताच जेवण झाले. साडे आठला स्टेशन वर पोचलो. रघुनंदनजी, संजयजी सगळ्यांचा निरोप घेऊन फलाटावर आलो. गाडी पण वेळेपूर्वीच आली. गुवाहाटीकडे प्रवास सुरु झाला. प्रवासाने सुरू झालेला दिवस प्रवासानेच संपतो आहे.

आता गाडीने नागालँड मागे सोडले आहे . मन मात्र अजूनही छात्रावासातील मुलांमधे, विज्ञान प्रयोग, आणि टेनिंग परिसरातील रस्त्यावरच आहे.  ईशान्य भारतात मन रेंगाळत रहातेच,आणि सोबतीला डोक्यात खूप सारे प्रश्न तयार होतात.

 

अमर परांजपे @ 27 एप्रिल 2022

Comments

  1. लिखाण वाचून पण जर पुढे काय अशी ओढ लागत असेल... आणि नागालँड मध्येच आहोत असे वाटत असेल... तिथेच रमायला होत असेल तर प्रत्यक्ष जाऊन आल्यावर पुढचा काही काळ आपण तिथेच असणे सहज होणार....

    ReplyDelete
  2. ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम कि गंगा बहाते चलो चा खराखुरा अनुभव देणारा लेख ,धन्यवाद अमर.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दिवस १ - पार्श्वभूमी

दिवस 3 - दिमापूर... आणि टेनिंग प्रवास

दिवस 5 – प्रयोगातली मजा, आणि सत्संगाचे प्रयोजन