दिवस 7 – शिकण्या - शिकवण्याचे रसायन
आज पहाटे 3 वाजताच जाग आली, झोप पूर्ण होऊन. बहुदा आता मी पण इथल्या दिनक्रमाला सरावलो आहे. पहाटे सूर्योदय व्हायच्या आधीच खोलीतून बाहेर पडलो. खूप मस्त वातावरण होते. हवीहवीशी वाटणारी थंडी, थोडे धुके, मंद चंद्र प्रकाश. अहाहा!! एखादी कथा,कादंबरी लिहायला पोषक वातावरण. पण फक्त वातावरण असून चालत नाही ओ.. विषय आडात लागतात तर पोहऱ्यात उतरणार. आमची वर्णने चंद्रप्रकाश आणि आकाश यातच संपतात. असो,
सकाळच्या
प्रार्थनेनंतर लगेचच उपासना करून घेतली.
त्यानंतर चहा तर ठरलेलाच. आम्ही छात्रावासाचे पाहुणे असल्याने आम्हाला चहा, जेवण वगैरे वेळेत मिळावे यासाठी पण
मुलांच्या वेगवेगळ्या गटांना ते काम दिलेले आहे. साकार आणि स्वप्नील खरे तर रोज
चहा पीत नाहीत पण इथली मुले इतक्या प्रेमाने चहा आणून देतात की, नाही म्हणणे शक्य होत नाही. खास आमच्या साठी दूध घातलेला चहा बनवला जातो.
पहिल्या दिवशी चहा नको वगैरे म्हंटल्यावर थोडा घोळ झाला. मुलांना वाटले की आम्हाला
मिल्क पाऊडरचा चहा आवडला नाहीये. त्यांनी तसे त्यांच्या संबंधित शिक्षकांना
सांगितलं बहुतेक कारण मग आमच्यासाठी अमूल ताजाचे दूध आणले गेले. इतके
आतिथ्य कधी कधी अंगावर येते हो !!
खरंच
आपल्याकडे कुणी ईशान्य भारतीय कार्यकर्ते किंवा अगदी विद्यार्थी आले तर आपण काय
करू नक्की? आपल्या 'पाहुणा' आणि 'आतिथी' यांच्या व्याख्या काय आहेत नेमक्या.. या नोटवर तुम्ही पण जरा विचार करून
बघा बरं. मी करतोच आहे..
आज आम्हाला रासायनशास्त्रातले काही प्रयोग घ्यायचे होते आणि ते प्रयोग आधी खूप वेळा घेतलेले नव्हते त्यामुळे थोडे दडपण होते. रसायनशास्त्र शिकलेलो असणे वेगळे, १२वीत मार्क पडणे वेगळे आणि त्याच किंबहुना सोप्या संकल्पना 8 वी, 9 वीला शिकवणे वेगळे. शिक्षकाला थोडा अधिक सखोल अभ्यास करून वर्गात जावे लागते, म्हणजे तशी शिक्षकीपेशाची अपेक्षा आहे. मी पूर्वी काँलेजमधेच शिकवत असल्याने आणि NTS ला देखील GMat शिकवल्याने प्रत्यक्ष रसायनशास्त्र प्रयोग लहान वर्गांवर घेतले नव्हते. संधी होती ही. त्यातून पण त्यातल्या 2 प्रयोगात लिंबाचा रस लागणार होता आणि तो आमच्याकडे नव्हता. (गावात लिंबू मिळाले नाही हे मी मागच्या लेखात लिहिले आहेच.. ते का हवे होते ते आज सांगतो) लेमन juice आणला होता, पण त्याने काम होणार की नाही याची खात्री नव्हती. त्यामुळे आधी ते करून बघणे गरजेचे होते.
करून पाहिले, झाले नाही. मग काय तो प्रयोग न घेता दुसरे घ्यायचे. पण असे सोडून दिले तर काय मजा ना. थोडा विचार केल्यावर जाणवले की यात पाण्याचा अंश खुप जास्ती आहे, तो कमी करायला हवा. मग सरळ ती बाटली घेऊन स्वयंपाक घरात गेलो आणि गॅसवर ठेऊन तो उकळला, भरपूर वेळ. जवळ जवळ एक चतुर्थांश केला.
परत तोच प्रयोग करून पाहिला.
येस, जमला.. ये हुई ना बात, समस्या
परिहार ऐसे होता है।
मग
राहिलेल्या प्रयोगांची तयारी पण पटकन झाली. तरी वेळ शिल्लक होता. मग अंघोळ करून
घेतली. इथे छात्रावास दिनक्रमात सहसा कोणी सकाळी अंघोळ करत नाहीत. पण आपल्याला सवय
असतेच. दिवस सुरू झाल्याचा फील येत नाही ना
!!
दोन
दिवसांपासून एक निरीक्षण करत होतो की वर्ग चालू असताना मुले (मुली सुद्धा) काहीतरी
चघळत असतात. बहुतेक चुइंगम. ते खटकत होतेच. आज शाळा नव्हती आणि आमच्यासाठी मुले
आलेली होती थोडक्यात मुले शाळेच्या चौकटीत नव्हती आमच्या ताब्यात होती..म्हणून
संधी घ्यायचे ठरवले. आणि मग सरळच विचारले मुलांना की काय खाताय, का खाताय वगैरे. हे बरोबर आहे का? आणि मग बाहेर जाऊन
चुइंगम टाकून यायला सांगितले. स्वप्नील म्हणालाच की, दादा
तुझ्यातला शिक्षक जागा झाला का एकदम! माझे
उत्तर हो असेच असणार होते. अर्थात त्या मुलांना चुईंगम खायची सवय का लागते, यावर त्यांचे शिक्षक काही का बोलत नाहीत. वगैरे प्रश्न आहेतच डोक्यात..
प्रत्येक कृतीला कारण असणारच. समजून घेतले पाहिजे..कारण खरा शिक्षक फक्त वर्गातला
विषय शिकवून थांबत नाही. त्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी
तो प्रयत्न करत असतो. माझे अनेक आवडते शिक्षक हे कटाक्षाने
पाळायचे, मूळ कारण समजून घ्यायचे. प्रसंगी फटकाही द्यायचे तर
क्षणात त्या मुलावर जबाबदारी देऊन पुढे जायचे. त्यातून मुले उमगत जातात, त्यांच्या वागण्याचा
कार्यकारणभाव कळत जातो. आपणही संधी मिळेल तेव्हा विज्ञानापलीकडे ही मुले समजून
घेतली पाहिजेत...प्रयत्न करतोय..
11
वाजता 9वी चा गट आला. मग तेच प्रयोग नववीसाठी. दुसऱ्यांदा केले की पक्के होते असे
का म्हणतात हे आज परत जाणवले. प्रयोगांचा क्रम बदलला की आपल्याला पण घेताना
कंटाळवाणे पण होत नाही हे लक्षात आले. शाळेतले विज्ञान शिक्षक 2-5 मिनिटे डोकावले
फक्त. बाकी 4 तास आम्ही आणि मुलेच. पण आम्हाला मजा आली. विशेष म्हणजे आम्ही
केलेल्या लिंबू रसाचे जुगाड कसे कसे केले, काय विचार करत गेलो हे ही मुलांना सांगितले. प्रयोग करत असताना अमुक एक
गोष्ट नाही म्हणून अडून राहण्यापेक्षा दुसरे मार्ग कसे शोधावे लागतात याचे उत्तम
जीवंत उदाहरण समोर होतेच.
दुपारी
विशेष काही नियोजन नव्हते. चहा आमचा आम्ही करून घेतो असे जाहीर केले. सकाळी लिंबू
रस उकळायच्या निमित्ताने स्वयंपाकघर
ओळखीचे झाले होतेच. नंतर थोडा वेळ वामकुक्षी तर ठरलेलीच!
उद्या
रविवार, नेहमीचे वेळापत्रक नाही. जवळ असलेल्या injav
(इंजाँव )या गावी जाऊन या असे मा. अजितराव कानिटकरांनी निघताना
सांगितलेले आहे. शाळेच्या उपमुख्याध्यापिका तलामसीजी त्याच गावाच्या, म्हणजे त्यांचे माहेर तिथले. दुपारी त्यांच्या घरी डोकावलो, उद्या सकाळी पाऊस नसेल तर जाऊन येऊया असे ठरले. हराक्का समाज मोठ्या
प्रमाणावर असलेले हे एक गाव बघायची उत्सुकता आहेच. 1986 -87 मध्ये या गावात चालतच
जायला लागायचे. टेनिंग पासून चालत 2 तास लागायचे हे पुण्यातून ऐकून आलो होतो.
तश्या तयारीनेच आम्ही आलेलो होतो. पण आता गावापर्यंत गाडी रास्ता झालेला आहे
त्यामुळे चालत जाण्याचा योग नाही येणार आम्हाला. मला खात्री आहे की गाडीने जाऊन
आलो असे सांगितले की बुजुर्ग लोक काहीतरी कमेन्ट करणार आहेतच. पण पर्याय नाही.
गाडी जात असताना पण चालत जाणे आम्हाला झेपणारे नाही!!!
रात्री
निवासातल्या मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. मुलं अगदी दंग होऊन गात, नाचत होती. शेवटी आम्ही एक फिल्म पण दाखवली. एका खेळाडू बद्दलची फिल्म
असल्याने मुलांना आवडली असणार नक्की. या कार्यक्रमामुळे बराच उशीर झाला आहे आज.
तेव्हा आता थांबतो.
अमर परांजपे@ 23 एप्रिल 2022
ता. क. - सलग 7 दिवस लिहितो आहे हेच माझ्यासाठी खूप आहे. त्यामुळे बहुदा आज थोडा आळस केला आहे असे वाटले ना अनेकांना. पण नाही. उद्या “रविवार माझ्या आवडीचा” असल्याने काही वेगळे अनुभव घ्यायचे आहेत आणि त्याच धुंदीत आम्ही सगळे आहोत. त्यामुळे आजचे लेखन थोडे छोटे झाले आहे. इतकेच. चला तर, उद्या पण असणार न सगळे आमच्या बरोबर.
Tum भी chalo hum भी chale chalti rahe zindgi ...the all Time popular song of Kishoreda and his spontaneous activities as a director ,actor
ReplyDelete,singer and what not. Memorized ,mesmerized too...thanks to Amarji ..Amar you are also alrounder like Kishoreda in Educational field , with your experience of lemon , I rememer a incident, once we missed Lemon,for SSY kasay ( lemon ,,jeera, dhaniya ,jaggery and adrak - jinjar kadha ),our Sunil Guruji mechanical Engineer used tomato in place of Lemon ,which was readily available in Aurangabad Ahram , innovative aproach is always with Engineer person normally....
या वाचनाने आम्ही पण तुमच्या सोबत प्रवास करत आहोत.... मज्जा येतीये.... आणि serial episode सारखे आता पुढे काय असेल हे जाणून घ्यायची इच्छा असते....
ReplyDeleteलेमन ज्युस उकळून concentrate तयार, वाह क्या बात
ReplyDelete