दिवस 8 - भ्रमंती, भटकंती

 आज रविवार असल्याने नेहमीचे वेळापत्रक नव्हते, कुठले सत्र पण घ्यायचे नव्हते. शिबिरादरम्यान अशी सुट्टी म्हणजे आम्ही पटकन आवरून बाहेर पडलोच म्हणून समजा.

इकडे येण्यापूर्वी अजितरावांना भेटलो तेव्हा त्यांनी इंजाव या गावाला भेट द्या असा सल्ला दिला होता आणि त्यांचे 86-87 सालातले काही संपर्क पण दिलेले होते. ह्या शाळेतल्या उपमुख्याध्यापिक तलामसी मॅडम माहेरच्या त्याच गावातल्या आहेत हे समजले होते आणि रविवारी तिकडे जाता येईल का अशी चर्चा पण झाली होती, हे कालच्या भागात तुम्ही वाचलेच. अर्थात अजितरावांचा आग्रह होता की आम्ही चालत जाऊन यावे (त्यांनी स्वतः तसे 2-3 वेळा केलेले असल्याने, आम्ही तसा अनुभव घ्यावा हे वाटणे स्वाभाविक आहे..तेव्हा त्यांनी जाणे, तो प्रवास खूपच कष्टाचा आणि थ्रिलिंग असणार हे नक्कीच)  सकाळचे जेवण झाले की 9 वाजता निघुया हे ठरलेलं होतं (अर्थात गाडीतूनच).

सकाळी उठलो तेव्हा सुदैवाने हवा स्वच्छ होती, थोड्याच वेळात ऊन पण पडले. सकाळचे सगळे आवरून आम्ही 9 वाजता तयार झालो तेवढ्यात निरोप आला की 10:30 पर्यंत निघायचे आहे. 

स्वप्नीलला काही दम धरवेना, तो 15 मिनिटे आधीच तिकडे जाऊन आला. मोठी गाडी उपलब्ध नाही, दोन छोट्या गाड्या (मारुती अल्टो) नेता येतील पण चालक एकच आहे असे सगळे समजले.. अमर दादा गाडी चालवेल असे स्वप्नीलनेच परस्पर सांगून टाकले आणि प्रश्न सोडवला. मलाही नागालँडमध्ये गाडी चालवायची आयती संधी!!

साधारण 11 वाजता निघालो, एरवी 5 मि. उशीर झाला तर अस्वस्थ होणारा मी ...तेव्हा तिथे कसा होतो हे मी काय सांगू. स्वप्नीललाच विचारा..

आम्ही तिघे, मॅडम, त्यांचे पती आणि दीर असे 6 जण.  माहेरी जात असल्याने वाटेत 2 ठिकाणी भाज्या, बिस्किटे पासून मासे पर्यंत खरेदी झाली मॅडमची. एकुणच माहेरी जायचे म्हणजे काय हे जगभरात सगळीकडे सारखेच असावे बहुतेक. इथे तर आम्ही मोठ्या गावातून खेड्यात निघालो होतो. त्यामुळे तिथे न मिळणाऱ्या वस्तू घेत जाणं अगदी सहाजिकच होतं.

टेनिंग टाऊन मधून चढ चढून टेनिंग व्हिलेज आणि तिथून पुढे इंजाव कडे जाणार रस्ता. काय, रस्ता कसा होता?? अहो, हा प्रश्न नसतो विचारायचा. रस्ता होता एवढेच. पण बराच बरा होता. अल्टो गाडी जाऊ शकत होती. टेनिंग व्हिलेज पासून साधारण 10 किलोमीटर अंतरावर इंजाव चा फाटा लागला. सरळ गेलेला रस्ता मणिपूर सीमेकडे जातो असे कळले. रस्त्यावर पाट्या वगैरे काहीच नाहीत. फाट्यापासून आत मधला रस्ता अर्थातच अजून खराब. 12-13 किमी अंतर जायला साधारण एक तास लागला.

गाव मस्तच होते. गावाच्या वेशीवर गाई आणि मिथुन (हा प्राणी तुम्हाला माहिती असेल असे गृहीत धरतोय मी ) घुसू नयेत म्हणून बांबूचे मजबूत फाटक. आत गेल्यावर लगेचच डावीकडे सरकारी प्राथमिक शाळा.  पुढे दोन्हीकडे घरे. एकदम स्वच्छ. काही घरांचे काम चालू असलेले.


मॅडमच्या भावाच्या घरी पोचलो. त्यांची 80 वर्षाची आई आणि नुकतीच graduate झालेली भाची अश्या दोघीच घरी होत्या. पाणी वगैरे पिऊन मग फिरायला बाहेर पडलो. साधारण 1 किमी गेल्यावर तिथला खास view point आला. आम्ही उंच पर्वतावर, खाली खोल दरीत वाहणारी बराक नदी, उन्हाळ्यात पण भरपूर पाणी असणारी आणि पलीकडे परत उंच पर्वतराजी. ही बराक नदी ही नागालँड आणि मणिपूर मधली सीमारेषा. पलीकडे दिसणारे पर्वत मणिपूर मधले. त्यातला नागमोडी रस्ता, ती वळणे आहाहा ! 




निसर्ग सौंदर्य वर्णन करता येत नसल्याने, इथे गाडी चालवायला मिळाली तर, पुढे पंक्चरची काय व्यवस्था असेल, ही गाडी जाईल का, क्लच- ब्रेक  दाबून पट्टी किती झिजेल? नदीवरून जाणारा पूल कसा बांधला असेल  वगैरेच भाव माझ्या मनी येतात. गाडी काढावी आणि निघावे आणि मणिपूरची सैर करून यावी असे वाटले. अर्थात तिथे पोचायला काही तासांचा प्रवास करावा लागतो. शिवाय “दुरून रस्ता साजरा” हे आहेच.

तिथेच एका ठिकाणी एक छोटी गुहा बघायला मिळाली. सिंहाची गुहा असे म्हटले जात होते. आत मध्ये ती खूप खोल आहे असे कळले. आत जायचा मोह होत होता पण उगीच कशाला जंगलच्या राजाची वामकुक्षी मोडा!!

परत येताना तलामसी मॅडमच्या धाकट्या बहिणीच्या घरी गेलो. तिथे चहा बरोबर कच्ची पपई खायला मिळाली. त्याला फारशी चव नव्हती. एकंदरच इथल्या लोकांचे चवीशी थोडे वाकडे नातेच दिसते आहे, किंवा आपली टेस्ट तशी डेव्हलप झाली नाही.. उदर भरण  त्यांना जास्ती महत्त्वाचे!! न जाणो विविध फूडचेन सारखी "ईशान्य भारतीय फूडचेन" भविष्यकाळात आपल्याला दिसतीलही..  सध्या कसं पंजाबी, चायनीज,थाई  तसं "NE लेस स्पाईस फूडस्" अशी रेस्टॉरंट दिसतील आणि आपल्यातलेच लोक आनंदाने खायला जातील.. कल्पना कुणाच्या तरी डोक्यात यायचा अवकाश ..सध्या marketing जमान्यात काहीही शक्य आहे. अस्सल कोकणी फूड म्हणत "सांदण" , "घावनघाटलं" अशी हाँटेलं निघाली आहेतच की..मला खायला आवडत असल्याने जरा जास्तच सुचू लागलंय. वेळीच थांबतो...तर मुद्दा हा की एकुण स्वैपाकघरातील वेळ वाचत असणार इथल्या बायकांचा. नाहीतर आपण ...आपलं स्वैपाकघर म्हणजे एक फूड प्रोसेसिंग युनिट असतं.. आणि किती पण छोटं असूदेत सगळ्यांना त्या युनिटजवळच गप्पा मारायच्या असतात..अर्थात इथंही तसं असतंच..फायरच्या जवळच बसतात गप्पा मारायला. पण इथे हसडणे,कोचणे,परतणे,फोडणी देणे, विविध मसाले, ओली, सुकी वाटणं असली काही भानगड दिसत नाही.. असल्या क्लिष्ट प्रक्रियाच नाहीत तर त्यांना नावं  नागामिज भाषेत नावं असतील असं वाटत नाही. असो,  नवीन भाषा शिकणे माझा प्रांत नाही.. इथे कसं एक भात, भाजी उकडली की किचन बंद. खाण्यात फारच रेंगाळलो बुवा..पुढं जातो.

अजितरावांनी सांगितलेले नाव नाम्पिंग (Ngping) यांच्या वडिलांचे घर शेजारीच होते.  86-87 मध्ये हा 15 वर्षाचा मुलगा म्हणजे आता पन्नाशीच्या आसपास असणार वय. मला कौतुक असं वाटलं की इतका जुना संपर्क पण ते घर अजूनही तिथेच होतं. पुण्यातला ऐंशी सालातला वाडा शोधायला गेलो तर तिथे नेमकं काय दिसेल सांगता यायचं नाही. ते नाम्पिंग जंगलात कामासाठी गेलेले त्यामुळे प्रत्यक्ष त्यांची भेट होऊ शकली नाही. पण वडील भेटले, 80 च्या आसपास वय असावे. एकदम पारंपरिक नागा पोशाखात. फोटो काढू का असे विचारल्यावर जरा लाजलेच. मग तोंड वगैरे पुसून खुशीत तयार झाले. त्यांनी शिकार केलेल्या असंख्य प्राण्यांची मुंडकी घराबाहेर लावलेली होती. त्यांना आम्ही आणलेला  खाऊ दिला आणि बाहेर पडलो.

परत मुख्य घरी आलो. चहा बरोबर मिळालेले टोस्ट विशेष वेगळे होते. चहा मध्ये बुडावल्यावर केक खाल्ल्यासारखे वाटत होते. 

3 बहिणी, त्यांची मुले, नवरे असे कुटुंबच गोळा झालेले होते. त्यांच्याबरोबर फोटो काढून झाल्यावर त्यांच्या कौटुंबिक गप्पा सुरु असताना आम्ही परत फिरून आलो. तसंही त्यांची भाषा कळत नव्हतीच आम्हाला.. आणि घरगुती गाँसिपमधे इंटरेस्ट पण नव्हता.. म्हणजे काय की शेवटी घरातले जमले की काय बोलतात जे आपल्याकडे बोलतात तसंच तिथंही असेल या विचाराने पडलो बाहेर.

परतीच्या प्रवासात ठिकठिकाणी थांबून फोटो काढणे असा उद्योग होताच. एके ठिकाणी थांबलो असताना तलामसी मॅडमनी एक छोटे फळ खायला दिले. दिसायला हरभऱ्यासारखे, कच्चे हिरवे खाल्ले की अवळ्यासारखी चव तर पिकलेले लाल एकदम गोड. शेजारीच झाड होते. एक जण पटकन  चढला आणि खूप झुपके काढले. कोकणातल्या करवंदाची आठवण झाली एकदम. या अशा फळांच्या जाती आपल्या इकडे कोकणात रुजू शकतील असे वाटले..किंवा असतीलही मला माहिती नाही.

टेनिंग व्हिलेज जवळ पोचल्यावर उजवीकडे चर्च आणि डावीकडे चर्चने चालवलेली शाळा दिसली. 


हे कॅथॉलिक चर्च. चर्च बघता येईल का असे विचारले. आम्हाला एकदम father ना च भेटवले गेले. 10 मिनिटे गप्पा झाल्या. आम्ही गावात आल्याचे त्यांना पण माहिती होते आणि पुढच्या वेळी आधी ठरवूया मग आमच्या शाळेत पण घ्या नक्की workshop बगैरे बोलणे झाले. हरकत नाही. हे ही नसे थोडके. शाळा खूपच देखणी वाटली. का माहिती नाही पण चर्च जवळ एक गूढता वाटते तशी इतर कुठल्या प्रार्थनास्थळात वाटत नाही. कदाचित अती भव्य, उंच घुमटाकार आस्थापने, इमारत आणि  अती स्वच्छता यामुळे असेल. आपल्या देवळांमधे एक घरगुती गंध पसरलेला असतो तसा मात्र इथल्या मेणबत्त्या, उदबत्यांना येत नाही.

परत येता येता राजूजींच्या घरून त्यांच्या पत्नीचा  फोन आला की घरी येऊन जा. गेलो. तर खीर समोर आली.  नंतर कळले की आज त्यांच्या सासऱ्यांचे वर्ष श्राद्ध होते आणि त्याचा प्रसाद म्हणून खीर केलेली आहे.

 एकदम आपल्या इथल्या श्राद्ध- पक्षाची आठवण झाली.. यावर विश्वास आहे का, असावा का यात पडायचंच नाही मला.. निरीक्षण कौशल्य वापरलं तर असं दिसतं या हराक्का जमातीत  सुद्धा वर्षश्राद्ध करतात तर..हिंदू हा धर्म आहे पण त्याहून अधिक ती जीवनपद्धती आहे. या हिंदू शब्दात अनेक जाती पंथाचे लोक सामावून घेतलेले आहेत. महाराष्ट्रात जाती,उपजातींमधे आपण गुंततो..बाहेर पडलो की व्यापक हिंदू जीवनपद्धती समोर येते. लग्न पद्धती, नामकरण समारंभ, एकत्र भजन गाणे, मंत्रांचे जागरण, नैवेद्य पद्धती, अगदी  अंत्येष्टी असे त्या त्या समाजात त्या त्या पद्धतीने चालू असते. हवामान, भौगोलिक विषमतेमुळे ,चेहरेपट्टी यांतील बाह्य फरक आहेच.. पण असे काही बघितले की एक साम्य जाणवते आणि अशा जगण्यातील अनेक साम्याचे धागे धागे जोडून ही हिंदूजीवन पद्धती घडलीय का? अनिष्ट रुढीमधून बाहेर पडायला हवंच पण खरंच त्या रुढी ,परंपरा चूक आहेत की त्या सुरू करताना त्यामागची  मूळ भावना खूप गरजेची, महत्त्वाची आणि शास्त्रीय होती...आणखी एक विचार डोक्यात सुरू झालाय..

गेल्या आठ दिवसात ताजे दूध पण बघायला मिळालेले नसल्याने खीर म्हणजे स्वर्ग सुखच !! (हो 'अमूल ताजा' दूध असलं तरी ते ताजे दूध नव्हेच)खीर खात असतानाच चर्चच्या शाळेच्या हेड मिस्ट्रेसचा तलामसी मॅडमना  फोन आला,  की उद्या त्यांच्या शाळेत एक सत्र घेता येईल का? वाह, एका भेटीचा परिणाम जोरात झाला म्हणायचा. त्याच आनंदात निवासात परतलो.  बघूया उद्या काय काय होते.

आम्हाला तिथे केवळ विज्ञान आणि लागलंच तर त्यातलं गणित पोहोचवायचं आहे ...गणित-विज्ञान हे विषय धर्मनिरपेक्ष आहेत अशी माझी धारणा आहे.

 

अमर परांजपे @ 24 एप्रिल 2022

Comments

  1. मज्जा येतीये....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दिवस १ - पार्श्वभूमी

दिवस 3 - दिमापूर... आणि टेनिंग प्रवास

दिवस 5 – प्रयोगातली मजा, आणि सत्संगाचे प्रयोजन