दिवस 9 - विज्ञान प्रयोग आणि प्रयोग विज्ञान

आज आमच्या इथल्या कामाचा शेवटून दुसरा दिवस. हराक्का शाळेतील 8वी आणि 9वी च्या गटासाठी छोटे सायंटिस्टची 6 सत्र घेणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट. मधला एक दिवस नियोजनाप्रमाणे न झाल्यामुळे आज तसे चौथेच सत्र होणार होते. 

आजचा विषय sound and light असा होता. यातली theory पक्की माहिती होती पण प्रत्यक्ष हे प्रयोग कधी करून घेतलेले नव्हते त्यामुळे थोडे टेन्शन होतेच. 

पहाटे 4 वाजताच नेहमीप्रमाणे जाग आली. सूर्योदय व्हायचा होता पण फटाफटायला लागलेले होते. वातावरण प्रसन्न होते. 10-15 मिनिटे शांत बसलो बाहेर येऊन. साडेचार नंतर आवरणे सुरू केले. प्रातः स्मरण , उपासना, चहा पान  रोजच्या प्रमाणे झालेच. नंतर मात्र थोडा वेळ आजच्या प्रयोगाचा अभ्यास (वाचन आणि व्हिडिओ बघणे इत्यादी) केला. प्रवचनापूर्वी स्वाध्याय करायलाच पाहिजे ना!! मागे पण एका लेखात उल्लेख केला..सहज आठवलं म्हणून परत सांगतो प्रशांत दिवेकर लिखित  स्वाध्याय प्रवचने च। पुस्तक जरूर वाचा. 

सकाळचे जेवण  नेहमीप्रमाणे साडे आठ वाजता करून आम्ही शाळेत हजर झाले. आमचे अती थोडे भात खाणे बघून असेल किंवा अन्य काही पण आता आम्हाला सकाळच्या जेवणात उकडलेले अंडे मिळायला लागलेले होते.  8वी च्या वर्गात मी आणि 9वी च्या वर्गात स्वप्नील असे एकावेळी / समांतर सत्र चालू केले. साकारचे काम दोघांना योग्य ते साहित्य पुरवायचे. डेटॉलची बाटली आणायची राहिली आणि शाळेत पण मिळाली नाही त्यामुळे refraction of light दाखवणारा प्रयोग नीट होऊ शकलो नाही (डेटॉल ऐवजी पाण्यात sanitizer आणि detergent powder टाकून प्रयत्न केला होता पण नाही झाले). पण reflection of light दाखवणारा आणि laws of reflection दाखवता येतील असा एक प्रयोग / कृती नव्याने करून पहिली आणि दाखवली. 

साडे दहा वाजता दोघांनी सत्र थांबवली तेव्हा अजून 2-3 प्रयोग तरी दाखवायचे राहिले होते. मुलांना विचारले की, शाळा सुटल्यावर परत दुपारी येणार का? जवळ जवळ सगळेच तयार होते. असे मुलांना दुपारी परत बोलवायचे का वगैरे निर्णय अर्थातच मुख्याध्यापक आणि अन्य शिक्षकांवर सोपवणेच उचित वाटले. 

आम्ही तिघे तयारी करून कँथोलिक चर्चच्या शाळेकडे निघालो. तिथे चांगले चांगले प्रयोग घ्या, तिथले सत्र चांगलेच व्हायला हवे वगैरे सूचना देऊन आमचे टेंशन वाढवायचा पुरेपूर प्रयत्न इथल्या शिक्षकांनी केलाच. असो..

गाडीने साधारण 15 मिनिटे प्रवास करून आम्ही तिकडे पोचलो. स्वागतालाच fathar Anthony आणि शाळेच्या हेड मिस्ट्रेस  सिस्टर dailiam हजर होत्या. थोडेसे कोमट पाणी पिऊन (आजच सकाळी कुठेतरी वाचले होते की भाषणापूर्वी कोमट पाणी प्यायले की पूर्ण वेळ आवाज चांगला राहतो) लगेच वर्गात गेलो. 7वी ते 10वी ची सगळी मुलं मुली एकत्र केलेली होती. तो वर्ग छे छे ते सभागृहच होते,  पण विशेषच होते. निम्मा भाग स्टेज सारखा उंच आणि उरलेला निम्मा खाली. सगळी मुले खालच्या भागात बसलेली होती. मी एकंदर छोटे सायंटिस्ट काय आहे, आज काय करायचे आहे वगैरे प्रस्तावना करेपर्यंत स्वप्नीलने हिंदी विज्ञान गीत दाखवण्याची रचना केली. पोर्टेबल प्रोजेक्टर खूपच उपयोगी पडतो आहे. ऋत्विक फाटकने  हिंदी मध्ये अनुवादित केलेले हे विज्ञान गीत पण मस्त जमून आलेले आहे. याचा इंग्रजी अनुवाद पण कर असे सांगायला पाहिजे त्याला. 

प्रयोगाला सुरुवात करण्यापूर्वी मुलांची बसायची रचना प्रयोग बघायला आणि सहभागी व्हायला साजेशी करून घेतली. हे होत असताना तिथले एक शिक्षक हातात छडी घेऊनच उभे होते. शिस्त म्हणजे हाताची घडी तोंडावर  बोट  हे काही बरोबर नाही. प्रत्येक गोष्टीची शिस्तीची व्याख्या वेगवेगळी असते..आपण शिस्त शब्दाचा अर्थ फारच संकुचित करतो बरेचदा.. मग आजच्या तासाला शिस्त म्हणजे प्रत्येकाने प्रयोगात सहभागी होणे, दिसले नाही तर पुढे येऊन बघणे, खूप प्रश्न विचारणे इत्यादी  सांगितले. परत काही ते शिक्षक आले नाहीत वर्गात! पण तरी 3-4 शिक्षक उपस्थित होते. स्वतः father आणि हेड मिस्ट्रेस पण थांबलेले होते. 

विज्ञान म्हणजे कुठल्याही गोष्टीवर कोणीतरी सांगते आहे म्हणून विश्वास न ठेवता, ती गोष्ट सिद्ध करता येते का हे बघणे, त्यासाठी प्रयोग करायचे वगैरे वगैरे. अगदी तुमच्या शिक्षकांवर किंवा माझ्यावर पण विश्वास ठेऊ नका. प्रश्न विचारा, प्रयोगातून उत्तर मिळवा असे सांगत असतानाच पृथ्वी गोल आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते वगैरे शोध लावणाऱ्या  शास्त्रज्ञांना त्याकाळच्या चर्चनेच कसा त्रास दिला होता पण आता ते सिद्ध झालेले आहे वगैरे  हे एकीकडे आठवत होते. पण हे उदाहरण इथे देणे योग्य नव्हते!!! 

पुढचे 2 तास सत्र सुरू होते. फुग्यातून सुई आरपार घालणे वगैरे प्रयोगात शिक्षक पण सहभागी झाले होते. मुले प्रतिसाद उत्तम देत होती. प्रश्न खूप विचारले असे नाही पण आम्ही प्रश्न विचारल्यावर वर्गात शांतता राहत  नव्हती. निदान मुलांच्या डोक्यात खळबळ, हलचल होत होती एवढं नक्की.


Water pressure /head ची संकल्पना समजावून देताना चक्क माझ्या खांद्यावर एक मुलगा आणि त्याच्या खांद्यावर एक मुलगा अशी रचना प्रत्यक्ष केली. धमाल पण आली आणि संकल्पना पण लगेच समजली. 

Heating water in paper cup आणि straw flute हे नेहमी मुलांना आवडणारे प्रयोग घेऊन सत्र संपवले. शाळेसाठी छोटे सायंटिस्टच्या पुस्तिका, फोल्डस्कोप आणि त्याची हस्त पुस्तिका असे भेट दिले. 

त्यानंतर तिथल्या मुलींचे वसतिगृह आणि हेड मिस्ट्रेसचे घर असलेल्या ठिकाणी चहा पिण्यासाठी गेलो. चहा, बिस्किटे, शेव असा बेत होता. चहा पिताना बऱ्याच गप्पा झाल्या. सगळे लिहिणे शक्य नाहीये. पण  कॅथॉलिक आणि बाप्टिस्ट यामध्ये नेमका फरक काय हे समजले. आज आम्ही सत्र घेतलं ते हे कँथोलिक चर्च.. Father किंवा sister होण्यासाठी काय प्रक्रिया असते अशी उत्सुकता होती. ते खूप सविस्तर समजले.  एकूण 13 वर्षाचे प्रशिक्षण असते 10वी किंवा 12वी नंतर. पहिली 4 वर्षे सशुल्क असते. त्यानंतर एक निवड चाचणी होते त्यामधून खूप कमी जण निवडले जातात. यांच्या batch मध्ये 55 पैकी 3-4 जण च निवडले गेले. या चार वर्षात औपचारिक डिग्री पण पूर्ण होते. त्यानंतर 9 वर्षे विविध ठिकाणी प्रशिक्षण होते. कधी 9 ऐवजी 11 वर्षे पण लागतात. यानंतर सुद्धा बाहेर पडायला मोकळीक दिली जाते .त्यातून आयुष्यभर चर्चसाठी काम करायची तयारी असणाऱ्यांना दीक्षा दिली जाते. त्याला ordination असे म्हणतात. आयुष्यभर अविवाहित राहून विना वेतन चर्चसाठी काम करायचे बंधन त्यानंतर येते. वैयक्तिक, प्राथमिक गरजांची काळजी चर्च घेते.  Father नंतर बिशप, मग आर्च बिशप, मग कार्डिनल आणि मग पोप अशी पदे असतात. वरची पदे मिळवण्यासाठी काय करावे लागते किंवा  वरचे पद मिळवायची महत्त्वाकांक्षा आहे का असेही विचारले आम्ही... अर्थातच त्याला असे काही नसते, ते आपोआप होत जाते, God takes care वगैरे टिपिकल theoretical उत्तरे मिळाली. चर्चने चालवलेली शाळा आणि एखादी सामान्य शाळा यात फरक काय? तर moral सायन्स असा एक स्वतंत्र विषय शिकवला जातो, त्याचा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके केलेली आहेत. ही पुस्तके मात्र बघायला मिळू शकली नाहीत. गप्पा मध्ये जवळ जवळ एक तास गेला, त्यामुळे गप्पा थांबावाव्या लागल्या. Father ना ज्ञान प्रबोधिनी प्रकाशनाचे Man making हे पुस्तक भेट दिले. त्यावेळी प्रबोधिनीबद्दल थोडे सांगणे झाले. पुढच्या वेळी आधी नियोजन करून जास्ती दिवस या, असे सायन्स workshop आधी अनुभवले नव्हते असे फादर, हेड मिस्ट्रेस म्हणत होते.  वश एकुणच  निरोपाची देवाण घेवाण होऊन तिथून निघालो.


वाटेत थांबून मेडिकल मधून डेटॉल विकत घेतले. दुपारी 3 वाजता 8वी 9वी ची मुले परत शाळेत येणार होती ना! 

अगदी 15-20 मिनिटे निवासात येऊन विश्रांती घेऊन परत लगेच शाळेत गेलो. सकाळी राहिलेले आणि न झालेले असे प्रयोग घेतले. सगळ्या मुलांबरोबर एक ग्रुप फोटो पण काढला करण सगळे जण शाळेचा गणवेश न घालता आलेले होते. हे सगळे होत असताना शाळेतील एकही शिक्षक तिकडे फिरकला नाही. कुलूप उघडण्यापासून लावेपर्यंत आम्ही आणि मुले. साडेचार पर्यंत सगळे झाले. गेले चारपाच दिवस आमच्या साहित्याचा बराच पसारा शिक्षक खोलीत झाला होता . ते सगळे आवरले, उद्या लागणारे साहित्य, परत न्यायचे साहित्य आणि इथे शाळेत ठेऊन जायचे साहित्य असे 3 भाग करून ठेवले. 

गावात थोडी चक्कर मारून अमूल कूल आणि juice वगैरे पिऊन निवासात परतलो. परतत असताना जरा वेगळा रस्ता बघूया म्हणून निघालो आणि सूर्यास्त बघायची संधी आपोआप मिळाली. गेले काही दिवस ठरवून सुद्धा नेमका सूर्यास्त बघणे झाले नव्हते. सूर्यास्ताचे काही बरे फोटो काढता आले.

संध्याकाळी थोडा वेळ इथल्या हॉस्टेलचे वॉर्डन असलेल्या सरांबरोबर गप्पा झाल्या. इथली नावे विचारली तरी उच्चरता येत नाहीत आणि लक्षात पण राहत नाहीत ही एक माझी समस्याच आहे. जानेवारी ते मार्च असे तीन महिने पाण्याचा खूप प्रश्न येतो, भाज्या न मिळणे तर कायमचेच आहे वगैरे समस्या आणि मागे एकदा हॉस्टेल मध्ये चोरी होऊन कपडे वगैरे कसे गेले होते ही कथा ऐकायला मिळाली. आत्ता सुद्धा रोज मुले खालून पाणी भरून आणताना पाहतो आहेच पण एप्रिल महिन्यात पाऊस सुरू होतो त्यामुळे फारसा प्रश्न येत नाही. इथे एक 40 फुटी बोअर पण आहे पण बंद आहे. त्याची नेमकी समस्या काय आहे हेच कोणाला माहिती नाहीये.

रात्रीचे जेवण तलामसी मॅडम कडे ठरले होते. 7 वाजता जायचे होते पण त्यांना साडेसात वाजता अचानक एक ऑनलाइन मीटिंग आली त्यामुळे आम्ही साडेआठ वाजता गेलो.  काल इंजावमधून आणलेल्या पाल्याची चटणी, अजून एक पाल्याची भाजी, बटाटा भाजी, वरण, भात आणि चिकन असा छान बेत होता. पुरेसा उशीर झाल्यामुळे जोरदार भूक पण लागली होती. मस्त जेवण झाले.  साकार फारसा जेवत नाहीये अशी प्रेमळ तक्रार पण त्यांनी केली. आणि ह्या दोघांना जाऊदे परत, तुला सुट्टीच आहे तर राहा इथे अजून काही दिवस, जरा खा पी, तब्येत सुधार आणि मग जा परत अशी ऑफर पण त्याला मिळाली. एकीकडे गप्पा चालू होत्याच. आमच्या सत्रांचे त्यांनीं काढलेले फोटो शेअर करणे वगैरे उद्योग पण झाले. आम्ही बरोबर आणलेल्या प्रोजेक्टरचे कौतुक त्यांच्या बोलण्यात पण आले. उद्या 6वी 7वी च्या मुलांना पण काही छोट्या गमतीच्या फिल्म दाखवूया असे ठरले. ते काम साकारवर सोपवले आहे. तसेच मधल्या सुट्टी मध्ये सगळ्या शिक्षकांना प्रबोधिनीची फिल्म दाखवूया असे पण ठरले. एकंदर उद्याचा दिवस पण भरपूर मजा येणार हे नक्की. 

वाचकहो,

लोकरुचीपूर्ण लिखाण जमायला सराव लागतो, बैठक लागते... इथे एकाच दिवसात इतकं काय काय घडतंय, सगळं चिमटीत I mean शब्दात पकडणं मला अवघड होतंय. आज कँथोलिक चर्चचा अनुभव घेतला, उद्या बघूया उद्या काय काय घडतंय.


अमर परांजपे @ 25 एप्रिल 2022

Comments

  1. मी पूर्वी ही एकदा लिहिले होते की प्रत्यक्ष प्रयोगाबद्दल मला उत्सुकता आहे . आपल्यापैकी अनेक प्रौढांनी ही अनेक गोष्टींचे वैज्ञानिक रहस्य शोधलं नसेल किंवा त्यांना जाणवलं नसेल
    .काय दाखवलं काय अपेक्षित होतं आणि काय झालं या बद्दल उत्सुकता आहे
    उदाहरणार्थ: dettol नसल्यामुळे diffraction चा प्रयोग फसला इतपत ठीक. पण dettol काय करणार होतं? Density वैविध्य हवे होते का ? पाण्यात sanitizer मिक्स करून ही का फसला ? साखर किंवा मिठा चे द्रावण करता आले असते का ? असे माझे काही बालिश प्रश्न आहेत. असो
    एकंदर लिखानामुळे प्रबोधिनीची आणि स्वतः लेखकाची तलमळ आमच्यापर्यंत पोहोचली. लगे रहो.

    ReplyDelete
  2. फोटो पहात पहात वाचायला मज्जा येतीये.... हे उत्स्फूर्त लिखाण आहे..... फक्त प्रगोगांचे पुस्तक करून सगळ्यांसाठी खुले करता येईल का????

    ReplyDelete
  3. Atlist one liner / explanation of all experiments if given than basic of entire educational tour also a benefit of readers ,Amarji I am sure you can summarize in words all experiments .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दिवस १ - पार्श्वभूमी

दिवस 3 - दिमापूर... आणि टेनिंग प्रवास

दिवस 5 – प्रयोगातली मजा, आणि सत्संगाचे प्रयोजन