दिवस १० - भरभर संपलेला भरगच्च दिवस

रात्री राजुजींच्या घरून जेवण करून येईपर्यंत बराच उशीर झाला होता आणि लेखन राहून गेले होते. उद्या प्रवासात बरच वेळ मिळेल तेव्हा लिहू अश्या सबबीखाली झोपून टाकले. आत्ता पहाटेचे 2 वाजलेत, अचानक जाग आली ते ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाच्या आवाजाने. बाहेर येऊन पाहिले तर वेगळाच नजारा. ईशान्य भारतातील पाऊस पहायचा राहिला होता..चला ब्राह्म मुहूर्तावर तोही पहायला मिळाला तर..मला कशी जाग आली कोण जाणे आणि हा निसर्गाविष्कार बघायला मिळाला..  रात्री हे रूप भीषण वाटत होतं..दिवसा पाऊस सौम्य वाटतो..अगदी कडाडत पडला तरी, धुंवाधार बरसला तरीही.. रात्री मात्र हा पाऊस रौद्र वाटतोय. परत खोलीत आलो पण झोप येईना.

निद्रेमधूनि जागा होता नवाच मी मजला दिसतो ।

उलगडणारी दुनिया भवती मी मध्ये माझा नसतो ।

या पद्याच्या ओळी आठवल्या . गूढ, वेगळाच  अर्थ जाणवला त्यावेळी

काय होत होतं कोण जाणे..


म्हणून मग लिहायला घेतले. बहुदा लेखन पूर्ण केल्याशिवाय इथून जाऊ नये अशी देवाची इच्छा दिसते आहे. चला 

हा शेवटचा दिवस टेनिंग मुक्कामातला.

बाकी सकाळ नेहमीप्रमाणे - प्रातः स्मरण, उपासना. उपासना झाल्यावर चहा पिणे, बरोबर टोस्ट. साडेआठ वाजता सकाळचे जेवण करून शाळेत पोचलो. 9 ते 11 दरम्यान 8वी वर सत्र झाले. पहिला निम्मा भाग स्वप्नीलने निरीक्षण कौशल्यावर घेतला तर पुढचा अर्धा वेळ मी मेणबत्ती वरचे प्रयोग घेतले (हे प्रयोग शिकवता यावेत म्हणून येण्यापूर्वी खास प्रणवला भेटून त्याच्याकडून दीक्षा घेतली होती). हा जरा वेगळा भाग आहे. ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत शिकल्यामुळे मेणबत्ती आणि निरीक्षण कौशल्य वगैरे माहिती आहे, पण शिकवायचे कसे याची दीक्षाच घ्यावी लागते.

 “What exactly burns in a candle?” ह्या प्रश्न पासून सुरुवात करायची आणि त्याचे उत्तर मिळवण्यासाठी एक एक प्रयोग करत जायचा, मूळ प्रश्नाचे उत्तर मिळवत असतानाच अजून प्रश्न पडत जातात आणि त्यातूनच प्रयोगांची मालिका तयार होते. आता काही जणांना असे वाटेल की हा तर काय सोपाच प्रश्न आहे. त्यासाठी प्रयोग कशाला? पण ते तसं नाही.. कधीतरी प्रत्यक्ष सत्रच घेऊन दाखवतो तुम्हाला. या तुम्ही पण.

तसेच सत्र 11.30 ते 1.30 या वेळात 9वी च्या वर्गात घेतले. मधल्या वेळात शाळेची मधली सुट्टी सुरू असताना शिक्षक खोलीत सगळ्या शिक्षकांना ज्ञान प्रबोधिनीची फिल्म दाखवणे आणि बाकी माहिती सांगणे असा कार्यक्रम ठरल्यानुसार झाला. 

स्वप्नील सत्र घेत असताना राजूजींनी मेजर प्रशांत यांना फोन लावून दिला. मेजर प्रशांत मूळचे पुण्याचे आहेत आणि काही वर्षांपूर्वी इथल्या आसाम रायफलच्या तळावर मुख्य अधिकारी होते, सध्या पंजाब मध्ये आहेत. त्यांनी ज्ञान प्रबोधिनी निगडीच्या गुरुकुल मध्ये काही काळ शिकवलेले आहे. फोनवरच्या संभाषणात, मेजर प्रशांतनी आसाम रायफलचा तळ नक्की बघून या असे सुचवले .

शाळा सुटतानाच्या प्रार्थनेवेळी सगळ्या विद्यार्थ्यांसमोर आमचा सत्कार झाला. स्वप्नीलने सत्काराला उत्तर म्हणून छोटेखानी भाषण केले. प्रबोधिनीच्या वतीने शाळेसाठी आणलेली भेट दिली. नंतर अर्थातच विद्यार्थी, शिक्षक अश्या गटांबरोबर  ग्रुप फोटो काढणे झालेच.


सगळे सामान आवरून निवासात आलो आणि जवळ जवळ लगेचच आसाम रायफलच्या तळावर जाण्यासाठी निघालो. तलामसी मॅडमनी तिथल्या प्रमुखांशी संपर्क केला होता. ते बाहेर होते पण आम्हाला जायला त्यांनी परवानगी दिली होती. गाडीची सोय पण केली होती हे सांगायला नकोच.

गाडीने साधारण 20-25 मिनिटे प्रवास केल्यावर एका उंच टेकडीवर हा तळ आहे. 40 जवान, त्यांचे नेतृत्व करणारे सुभेदार रमेश राय आणि मेजर दर्जाचे प्रमुख अधिकारी अशी रचना आहे. सुभेदार साहेबांनी आमचे स्वागत केले. “जयहिंद साब” अशी संवादाची सुरुवात केल्याने ते एकदम खूष झाले. "आप कभी आर्मी मे थे क्या?" असा प्रश्न आलाच. परीक्षांचे ,मुलाखतींचे सोपस्कार सफल संपूर्ण करून मला १२वी नंतर  NDAमध्ये प्रवेश मिळाला होता..तिथे काढलेल्या एक महिन्याची ही कृपा. JCO अधिकाऱ्याला साब म्हणायचे आणि CO अधिकाऱ्याला सर हे तिथे शिकलो होतो. सुभेदर साहेबांनी संपूर्ण तळ फिरून दाखवला, आजूबाजूची गावे दाखवली. या सगळ्या गावांची जबाबदारी या तळकडे आहे. नंतर चहा आणि काजू असा फराळ. सहज विचारले की इथे मराठी कोणी आहे का? लगेच आवाज दिला गेला आणि श्री पांडुरंग कोंडेकर धावतच आले. मराठी पाहुणे बघून ते ही खूष झाले. कोल्हापूर मधल्या कागल तालुक्यात त्यांचे गाव. मी सांगलीचा हे ऐकून ते आणखीनच आनंदले. परत नव्याने गप्पा, त्यांचा दिनक्रम, पेट्रोलिंग, ड्युटी वगैरे छान  समजावून सांगितले त्यांनी. निघताना बाकरवडी आणि आंबा बर्फी दिल्यावर तर ते जामच खूष झाले. साधारण तासभाराचीच ही भेट खूप उत्साहवर्धक होती हे नक्की.

भारतीय जवान कुठेही भेटले की उर अभिमानाने भरून येतो..इथे टेनिंगमधील तळ बघून खरंच भारावून गेलो आम्ही.

तिथून बाहेर पडल्यावर परतीच्या रस्त्यावर असताना, राहिलेली एक शाळा म्हणजे बाप्टिस्ट चर्चची शाळा, तिकडे चक्कर मारून येऊया असे ठरवले. शाळा तर सुटलेली असणार होती पण तिथले मुख्याध्यापक जवळपास राहत असतील तर भेटतील असा विचार केला. पोचलो शाळेजवळ, सुदैवाने मुख्याध्यापक हॉस्टेल मध्येच रहात असल्याने भेट झाली. 


आम्हाला त्या शाळेत सत्र घ्यायला बोलावून नंतर ते रद्द केल्याची फारशी खंत त्यांना वाटत नव्हती. "I don't have any problem, but this school is run by an organisation and your workshop was organised by another organisation who has different denomination"  असे साधे explanation होते त्यांचे.  त्यावर "We are here for conducting science workshop for students and science doesn't look for any denomiations. Everybody is at par in front of science. We already conducted one session at school run by Catholic Church." असे त्यांना सांगितल्याशिवाय राहवले नाही.  त्यावर पण त्यांच्याकडे उत्तर होतेच. "Catholics are different and we are different, but as Christans we are one."  हे ऐकून खरं तर चांगलाच राग आला होता. पण शांत राहणे गरजेचे होते आणि उत्तर देणे पण आवश्यक होते. राग आल्यावर इंग्रजी बोलणे अवघड जाते हो!! पण तरी उत्तर द्यायचे होतेच.  "I don't agree with you sir. I think as a teacher we should not look for denominations and what we should teach to our students that before all denominations we are same and equal as Indians. We come from organisation which works for nation building".  अरे, मी हे बोललो, नाही नाही, कोणीतरी हे सगळे बहुदा माझ्याकडून बोलवून घेतले.  कर्ता करविता(बोलविता ) तोच... कसे काय माहिती, पण हे वाक्य बोलत असताना मला वारंवार  कै. विवेक पोंक्षे सरांची आठवण येत होती. ईशान्य भारतातल्या मुलांमध्ये भारतीयत्व रुजवण्यासाठी आयुष्य खर्ची घातलेल्या सरांना हे फादरचे बोलणे  ऐकत असताना किती राग आला असता. सरांनी यावर काय उत्तर दिले असते...मी तिथे असतो तर आमची काय चर्चा झाली असती...सरांची आठवण प्रकर्षाने झाली हे खरं..असो!

माझ्या या वाक्यामुळे साहेब थोडे चपापले पण पुढचा संवाद चांगला झाला. आम्ही हिंदी मध्ये बोललेले त्यांना कळत होते पण ते स्वतः अजिबात हिंदी बोलत नाहीयेत हे लक्षात आलेले होतेच. मग बाप्टिस्ट म्हणजे नेमके काय, मुख्यालय कुठे आहे वगैरे बोलणे पण झाले. ही शाळा LBA म्हणजे Leban baptist Association द्वारा चालवली जाते आणि हे असोसिएशन NBCC म्हणजे Nagaland Baptist Coordination Council, ज्याचे मुख्यालाय कोहिमा मध्ये आहे, त्याच्याशी संलग्न आहे. 8वी पर्यंत NBCC चा  स्वायत्त अभ्यासक्रम  शाळेत शिकवला जातो. 9वी, 10वी मात्र नागालँड बोर्डचा अभ्यासक्रम आणि पाठ्य पुस्तके असतात. शाळेविषयी बाकी पण माहिती कळली. शाळेत एकूण जवळपास 500 विद्यार्थी आणि 20 शिक्षक आहेत. त्यापैकी 84 विद्यार्थी हॉस्टेल मध्ये राहतात. शाळेमध्ये खडू फळा हे एकमेव साधन आहे. प्रयोगशाळा वगैरे काही नाही. साधा प्रोजेक्टर सुद्धा नाही. एकीकडे Local Traditional Tea असे म्हणून एक पेय आमच्यासमोर आले. आंबट गोड चवीचे छान गरम पेय होते. पेयपान संपल्यावर ज्ञान प्रबोधिनीचे माहितीपत्रक त्यांना दिले. ज्ञान प्रबोधिनीची माहिती थोडक्यात सांगितली. त्यांचा फोन नंबर घेतला. तो देताना पण बाबाने (फादरने )आधी फक्त official नंबर तेवढा दिला होता. Whatsapp आहे ना ह्या क्रमांकावर असे विचारल्यावर मग वैयक्तिक नंबर पण दिला. गंमत म्हणजे official नंबर BSNL चा होता ज्याला इथे range च नाही!! "You can visit our school during school hours  tomorrow"  हे ऐकल्यावर जरा बरे वाटले. पण आम्ही उद्या सकाळीच परत जाणार आहोत हे कळल्यावर "पुढच्या वेळी आम्ही 3 private शाळा मिळून तुमचे workshop organise करू म्हणजे मग बाकीचे काही प्रश्न येणार नाहीत. कोणाचेच बॅनर नको." या वाक्याने भेटीचा शेवट झाला. एकत्र फोटो पण काढला आणि ते आम्हाला गाडी पर्यंत सोडायला बाहेर आले. 

गेले 3-4 दिवस डोक्यात असलेले एक काम झाले तर. 

परत येताना टेनिंग टाऊनच्या मुख्य चौकात गाडीने आम्हाला सोडले. आज सकाळपासून सतत काही न काही सुरू होते, त्यामुळे काहीतरी खाऊया म्हणून नेहमीच्या हॉटेल मध्ये गेलो. नेहमीच्या... म्हणजे गेल्या 7 दिवसात आधी 2 वेळा आम्ही इकडे येऊन गेलो होतो. इथेच आमची बँक कर्मचारी अरिंदम यांच्याशी ओळख झाली होती आणि गंमत म्हणजे आजही ते इथेच भेटले परत. खूप गप्पा झाल्या. स्टेट बँक, त्याच्या शाखा, बीट, झोन, सर्कल अशी रचना, कर्मचारी बदल्या आणि प्रोमोशन अशी नवनवीन माहिती कळत गेली. गुवाहाटी सर्कल मध्ये म्हणजे पूर्ण पूर्वांचालत स्टेट बँकेच्या 800 शाखा आहेत हे ऐकून आम्ही चाटच पडलो. "Bank is lifeline"  हे वाक्य समजून घेणे माझ्यासारख्या शिक्षकाला जरा जडच गेले. असो

अरिंदमचा निरोप घेतला. एकत्र फोटो झालाच. शिवाय हे हॉटेल चालवणाऱ्या माय लेकींचा पण फोटो काढला. 2-3 वेळा दुपारी कडकडून भूक लागलेली असताना त्यांनीच तर आमची काळजी घेतली होती ना!

निवासात परत आल्यावर सामान आवरणे आणि पॅक करणे हे कंटाळवाणे काम उरकून घेतले. हॉस्टेल मधल्या मुलांची जेवणे झाल्यावर संध्याकाळी सात वाजता सगळ्यांना काही व्हिडिओ क्लिप दाखवायच्या असे ठरले होते. प्रोजेक्टर तर होता पण पुरेशी मोठी पांढरी भिंत नव्हती. पांढरे बेडशीट पण नाही. माझा पंचा हेच उपलब्ध असलेले सगळ्यात मोठे पांढरे कापड ! मग त्याचाच पडदा केला. 

ते सगळे सुरू असतानाच लाईट गेले आणि उजेड असतानाच सामान आवरून झाल्याबद्दल आम्ही स्वतःची पाठ थोपटून घेतली.

रात्रीचे जेवण परत एकदा राजुजींच्या घरी ठरले होते. ते स्वतः बंगाली, बालपण मणिपूर मध्ये गेलेले आणि गेली 22 वर्ष टेनिंग मध्ये काम करत आहेत. पत्नी अबुन या इथल्याच, हराक्का नागा. त्याही शाळेत शिक्षिका. एकाच वेळी शाळेतील शिक्षक आणि कल्याण आश्रमाच्या संघटनेचे काम अशी दुहेरी भूमिका पार पाडत आहेत. नागालँड मध्ये ज्ञान प्रबोधिनीने अधिक वारंवार येण्याची कशी गरज आहे हे त्यांच्या बोलण्यात येत होते. गेल्या 22 वर्षातला इथला विकास म्हणजे स्टेट बँकेची शाखा उघडणे आणि airtel चे नेटवर्क येणे... पूर्वी रोज येणारी बस आता एक दिवसा आड येते त्यामुळे चार चाकी गाड्या वाढल्या... बास! हे ऐकून सुन्न झालो.  खरंतर या सात आठ दिवसात खूप लोकाशी वेगवेगळ्या स्वरुपात गप्पा झाल्या सगळं उतरवणं शक्य नाही, पण पचवायचा, विश्लेषण करायचा माझ्या पातळीवर प्रयत्न मात्र करतोय मी.

जेवणात पोळीबरोबर इथला खास पदार्थ म्हणून केळफुलाची भाजी. अरे हा तर अस्सल कोकणी पदार्थ. भारताच्या विविधतेतून एकतेचे जेवणाच्या पानातून झालेले हे अनोखे प्रकटीकरणच की! 

शेवटी रसगुल्ला ! राजूजी मुळचे बंगालचे ना..रसगुल्ला खिलवल्याशिवाय बहुतेक त्यांना आमचे आदरातिथ्य पूर्ण केल्याचे समाधान वाटेना..जसं पुणेकरांना चितळेंची बाकरवडी. सांगलीकरांना रामविश्वासची बासुंदी...खास पदार्थांनीच माणूस त्या त्या प्रांताशी जोडला जातो हेच खरं.  गेल्या दहा दिवसातला जेवणातला हा पहिला गोड पदार्थ!!  गोडाशिवाय जेवणाला काय अर्थ !!

(सर्व डायबेटीक लोकांची मी मनात क्षमा मागितली आहेच)


लेखन पूर्ण होत आले आणि पाऊस पूर्ण थांबला आहे असे जाणवले. आता नव्याने झोपायला हरकत नाही. कारण सुरुवातीला मी म्हंटले तसे मी मध्यरात्री २ वाजता जाग आल्याने लिहायला घेतले आहे.....घड्याळात आता पहाटेचे ३.३० वाजलेत. तेव्हा पुन्हा थोडी झोप काढतो. परत पद्याच्या पुढच्या ओळी आठवतच झोपी गेलो.

साखरझोपेमधली हसरी स्वप्नमालिका अवतरते. 

कठोर अवघड सारे सरूनि आसमंत होती हिरवे


सकाळ झाली तेव्हा पावसामुळे आसमंत खरंच अधिकच हिरवा वाटत होता.


अमर परांजपे @ २६ एप्रिल २०२२

Comments

  1. मस्त... सरळ साधं आणि मनाला भिडणारं...
    लिहिते रहा...

    ReplyDelete
  2. Nice written sir

    ReplyDelete
  3. पावसाची आल्हाददायक व प्रसन्नता आपल्या लेखणीतून अनुभवण्यास मिळाली मनापासून धन्यवाद.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दिवस १ - पार्श्वभूमी

दिवस 3 - दिमापूर... आणि टेनिंग प्रवास

दिवस 5 – प्रयोगातली मजा, आणि सत्संगाचे प्रयोजन